उत्तर प्रदेशात 'तानाजी' करमुक्त, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:26 PM2020-01-13T15:26:17+5:302020-01-13T15:29:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा
मुंबई - अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्टारर सिनेमा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने तीन दिवसात 61.75 कोटींची कमाई केली आहे. तर, छपाकने बॉक्स ऑफिसवर केवळ 19.02 कोटी रुपये कमावले आहेत. त्यातच, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. त्यामुळे, अजय देवगणची भूमिका असलेला तानाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी होत आहे. त्यातच, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे. राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनट बैठकीत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा चित्रपट कधी करमुक्त होणार, अशी भूमिका सोशल मीडियावर नेटीझन्स घेत आहेत.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तानाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. सध्या, तानाजी अन् छपाक चित्रपटावरुन देशात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तानाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे.
#Tanhaji has a heroic weekend... Footfalls, occupancy, numbers multiply on Day 2 and 3... Sets BO on 🔥🔥🔥 on Day 3... #Maharashtra is exceptional... Other circuits witness big turnaround on Day 2 and 3... Fri 15.10 cr, Sat 20.57 cr, Sun 26.08 cr. Total: ₹ 61.75 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 13, 2020