मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 17:56 IST2025-04-14T17:46:02+5:302025-04-14T17:56:15+5:30
मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे.

मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे
Mumbai Water Tanker Strike: मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई टँकर असोसिएशने हा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या मध्यस्तीनंतर मुंबई टँकर असोसिएशने हा निर्णय घेतला. गेले पाच दिवस मुंबईतील टँकर चालकांचा संप सुरु होता. त्यामुळे मुंबईतल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अखेर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टँकर असोसिएशने संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
मुंबईतील खासगी विहिरी आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला होता. या संपाचा मुंबईतील गृहनिर्माण सोसायटी, कार्यालये, बांधकाम व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणाची दखल घेत संप मिटवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर भूषण गगराणी यांनी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता मुंबई टँकर असोसिएशने संप मिटवला आहे.
"मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यात येत आहेत. यापुढे टँकर असोसिएशनच्या कुठल्याही सदस्याला त्रास होणार नाही याची ग्वाही मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे. टँकर चालकांना जो दंड आकारला जातो त्यासंदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना जाऊन भेटणार आहोत," असे आमदार मुरजी पटेल यांनी म्हटलं.
दरम्यान, विहीर मालकांना पाठवलेल्या नोटिसांना महापालिकेने स्थगिती दिल्यानंतरही टँकर संघटनेने बंद सुरूच ठेवला होता. त्यामुळे काही सोसायट्या, हॉटेल्स आणि बांधकामांच्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सर्व प्रकारचे खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र आता त्याआधीच संप मिटवण्यात आला आहे.