टँकर माफिया पळवतात मुंबईचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:13 AM2019-05-21T06:13:27+5:302019-05-21T06:14:03+5:30

काँग्रेसचा आरोप; महापालिका आयुक्तांकडे केली तक्रार

Tanker mafia flees Mumbai's water | टँकर माफिया पळवतात मुंबईचे पाणी

टँकर माफिया पळवतात मुंबईचे पाणी

Next

मुंबई : पाणीटंचाईमागे अपुऱ्या पावसाइतकेच टँकर माफियाही जबाबदार आहेत. या टँकर माफियांनी मुंबईकरांचे पाणी पळविले आहे. या चोरीला अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याने टँकर माफियांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच मुंबईत पाणी समस्या कायम असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला आहे.


याबाबत काँग्रेसच्या शिस्टमंडळाने आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानुसार ही समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे देवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाणी समस्या, नालेसफाई, रस्त्यांच्या अर्धवट राहिलेल्या मान्सूनपूर्व कामांबाबत निवेदन देण्यासाठी मिलिंद देवरा यांनी सोमवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते रवी राजा, आमदार भाई जगताप, आमदार नसिम खान, माजी आमदार मधू चव्हाण आदी नेते उपस्थित होते. मुंबईत २० ते ३० टक्के अघोषित पाणीकपात सुरू असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कुलाबा, कफपरेड, वरळी, सायन कोळीवाडा, घाटकोपर, वांद्रे, भांडुप व पश्चिम उपनगरातील अनेक विभागांतील चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींना पाण्याची समस्या भेडसावत आहे. येथे निर्माण झालेल्या या पाणीटंचाईसाठी टँकर माफियाही जबाबदार आहेत. कुलाबा, पवई येथील पाणी माफियांची यादी पालिकेकडे सादर करण्यात आली आहे. त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे देवरा यांनी सांगितले.


टँकर माफियांवर कारवाई झाल्यास मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. मुंबईत काही ठिकाणी दूषित पाण्याची समस्या असल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी चोरून सर्रास त्याची विक्री केली जात आहे. टोलेजंग इमारतींमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत असतो. मात्र झोपडपट्ट्या, चाळींमध्ये पाणीपुरवठा होत नाही, हा दुजाभाव असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.


रस्ते दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात दीड हजार कोटींची तरतूद आहे. मात्र रस्त्यांची कामे आजही अर्धवट स्थितीत आहेत. तर नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले.

आंदोलनाचा इशारा
नालेसफाईचे काम महापालिकेने वेळेत सुरू केले. परंतु, या कामाची गती पाहता मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती, नालेसफाई ही कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करावीत; अन्यथा काँग्रेस पक्षामार्फत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवरा यांनी दिला आहे.

चोरी, गळतीमुळे नुकसान
दररोज विविध मार्गाने २५ टक्के पाणी वाया जाते. प्रतिदिन १६.७ दशलक्ष लीटर एवढे पिण्यायोग्य पाणी वाहने धुण्यासाठी वापरले जाते. मुंबईमध्ये प्रति व्यक्ती दररोज दीडशे लीटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या १३५ लीटर पाणी प्रति व्यक्ती मिळत आहे. दररोज सरासरी तीन हजार ८०० दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत सर्वत्र १० टक्के पाणीकपात पालिका प्रशासनाने लागू केली आहे.

Web Title: Tanker mafia flees Mumbai's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.