लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आजही अशी कित्येक ठिकाणे आहेत; जिथे मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नाही. यास विविध कारणे आहेत. मात्र, यामुळे संबंधित ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना पाणी चोरी करावे लागते अथवा पाणी विकत घ्यावे लागते. तसेच टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. यातून टँकरमाफियांचे फावत असल्याचे चित्र आहे.
मुंबईत जेव्हा केव्हा पाण्याची आणीबाणी येते, तेव्हा सोसायटीकडून पाण्याचे टँकर मागविले जातात. मात्र, अशा एका टँकरसाठी तब्बल पाच हजार रुपये आकारले जातात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मुंबईत एका टँकरसाठी दोन ते तीन हजार रुपये आकारले जातात; परंतु जेव्हा केव्हा पाण्याची गरज भासते, तेव्हा मात्र टँकरमाफियांकडून नागरिकांची लूट केली जाते.
पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह
तसेच टँकरने पुरविले जाणारे पाणी कितपत शुद्ध असेल ? यावर देखील प्रश्नचिन्ह असते. म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांत मुंबई महापालिकेला तक्रारी केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात फार कमी वेळा कार्यवाही होते.
------------------
प्रतिक्रिया;
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील कित्येक वस्त्यांना विविध कारणांमुळे मुंबई महापालिकेने पाणी नाकारले आहे. यात मानखुर्दसह मालाड येथील वस्त्यांचा समावेश आहे.
- बिलाल खान
------------------
पश्चिम उपनगरात बहुतांश ठिकाणी टँकरचे पाणी वापरले जाते. नागरिकांना यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागतात. शिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच.
- विनोद घोलप
------------------
जेव्हा केव्हा जलवाहिन्या फुटतात. तेव्हा काही परिसरात कमी दाबाने पाणी येते किंवा येत नाही. अशावेळी रहिवाशांना टँकरचेच पाणी मागवावे लागते.
- राकेश पाटील
------------------
मुंबई महापालिकेने आवश्यक ठिकाणी पाण्याचा पुरेसा पुरवठा केला तर टँकरमाफियांचे राज संपेल. मात्र, यातच मिलीभगत असल्याने याला आळा बसत नाही.
- अंकुश कुराडे
------------------