कशेडी घाटात गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला आग, महामार्गावर वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:02 PM2023-07-30T16:02:30+5:302023-07-30T16:02:54+5:30
इंडियन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला शनिवारी सायंकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान, छोटी वाहने सध्या काटे तळीमार्गे विन्हेरे- खेड मार्गाकडे वळविण्यात आली आहेत.
पोलादपूर : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चालत्या टँकरने अचानक पेट घेतला. यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इंडियन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला शनिवारी सायंकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान, छोटी वाहने सध्या काटे तळीमार्गे विन्हेरे- खेड मार्गाकडे वळविण्यात आली आहेत.
टँकरचालक दत्ता भोसले हा टँकर (क्रमांक यूपी ५३ इटी ४१२९) घेऊन खोपोली ते जयगड असा जाताना घाटात येलंगेवाडी गाव हद्दीत घाटात टँकरने अचानक पेट घेतला. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कशेडी व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूची वाहतूक थांबविली. टँकरची टाकी रिकामी असल्याची चालकाने माहिती दिली.
टँकरला आग लागल्यानंतर येलंगेवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून येलंगेवाडी येथील सर्व नागरिकांना पार्टेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला. पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर रुपेश पवार, स्वप्निल कदम, परेश मोरे, प्रकाश धायगुडे आदी पोलिस ठाण्याचे कर्मचारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी नर्विर रेस्क्यू टीमच्या सर्व सदस्य रुग्णवाहिकेसह तैनात आहेत.