जलवाहिनी फुटल्याने उपनगरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:46 AM2020-02-02T01:46:47+5:302020-02-02T01:47:29+5:30

महापालिकेच्या के पूर्व/पश्चिम विभागात पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, आज येणार पाणी

Tanker water supply | जलवाहिनी फुटल्याने उपनगरात टँकरने पाणीपुरवठा

जलवाहिनी फुटल्याने उपनगरात टँकरने पाणीपुरवठा

Next

मुंबई : जोगेश्वरीतील जेव्हीएलआर येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ वेरावली जलाशयाचा भरणा करणारी जलवाहिनी फुटल्यानंतर, शनिवारी त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर (पश्चिम) आणि कुर्ला (पश्चिम) या भागातील बाधित परिसरात नागरिकांना टँकर्सच्या एकूण ४९५ फेऱ्यांहून अधिक पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

जलवाहिनीस झालेल्या नुकसानाची व्याप्ती पाहता आणि त्यात येणाºया अडचणी लक्षात घेता, दुरुस्तीचे काम १ फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. २ फेब्रुवारीच्या सकाळपासून पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

२९ जानेवारी, २०२० रोजी सकाळच्या सुमारास जेव्हीएलआर येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ मेट्रो- ६च्या पायलिंगचे काम सुरू असताना, वेरावली जलाशयास जोडली गेलेली १,८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.

महानगरपालिकेतर्फे बाधित परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची गैरसोय होऊ नये, म्हणून वांद्रे (पश्चिम) येथे भाभा रुग्णालय; सांताकु्रझ (पूर्व) येथे वाकोला गावदेवी टनेल, वाकोला आणि मालाड (पश्चिम) येथे लिबर्टी गार्डन या ठिकाणी पाण्याचे टँकर विनाशुल्क भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

बाधित क्षेत्र असलेल्या म्हणजेच वांद्रे (पूर्व व पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व व पश्चिम), घाटकोपर (पश्चिम) या भागातील सहायक आयुक्तांना नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे, तसेच समन्वय साधण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिले. मुंबई शहर व उपनगरात उपलब्ध असणारे महानगरपालिकेचे व खासगी पाण्याचे टँकर्स बाधित भागात सेवा देण्यासाठी प्रशासनाने रवाना केले होते.

जलवाहिनी फुटल्यानंतर त्या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू असलेले दुरुस्तीचे काम १ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर, वेरावली जलाशय भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे जलाशय पूर्ण भरल्यानंतर वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर (पश्चिम), कुर्ला (पश्चिम) यासह बाधित सर्व भागांतील नागरिकांना २ फेब्रुवारीच्या सकाळपासून पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तसेच दुरुस्तीच्या स्थळी महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सायंकाळी पाइपलाइन दुरुस्त झाली आणि मॅनहोल बंद करण्यात आले.हाय प्रेशर काम पूर्ण झाल्यानंतर आता जलाशयातील पाणी भरण्यासाठी पाइपद्वारे उच्च दाबाने पाणी सोडण्यास तयार आहोत, अशी माहिती महापालिकेने दिली.

अशा होत्या टँकरच्या फेºया

महानगरपालिका प्रशासनाकडून एच/पश्चिम विभागात महानगरपालिकेचे १३ व खासगी ४७ अशा एकूण ६०; एच/पूर्व विभागात महानगरपालिकेचे २४ व खासगी ९३ अशा एकूण ११७; पी/उत्तर विभागात महानगरपालिकेचे ७ व खासगी १२० असे एकूण १२७; एल विभागात महानगरपालिकेचे ३ व खासगी १२६ अशा एकूण १२९; आर/उत्तर विभागात महानगरपालिकेचे २ व खासगी २० अशा एकूण २२; एन विभागात महानगरपालिकेचे २६ तर खासगी १४ अशा एकूण ४० पिण्याचे पाण्याचे टँकर्सच्या फेºया देऊन पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व मिळून ४९५ फेऱ्यांमुळे बाधित परिसरांमध्ये पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्यात आला.

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

जोगेश्वरी ते वांद्रे या विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झालेले आहेत. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे, तसेच त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी तीन दिवस लागतात, या गोष्टीचे आश्चर्य वाटते. लाखो लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तसेच टँकरवाल्यांनी पाण्याचे भाव चौदाशेवरून पाच-सहा हजारांवर नेले आहेत. मी कोल्हापूरला शूटिंगमध्ये होतो. आता घरी निघालो आहे. तर अंधेरीतील पाण्याची काय परिस्थिती आहे, हे मला घरातून कळत आहे. प्रवास करता- करता पाण्याच्या टँकरसाठी काही राजकीय मित्रांना संपर्क केले. तेही म्हणाले, आमच्याही घरी पाणी नाही.
- किशोर कदम, स्थानिक रहिवासी व अभिनेते.

Web Title: Tanker water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.