मुंबई - ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असली तरी पालिकेने केलेल्या दहा टक्के पाणीकपातीमुळे अनेक सोसायट्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अनेक सोसायट्या, झोपडपट्ट्यांमध्ये आवश्यक तसे १ हजार लिटरपासून टँकर मागणी सुरू झाली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच १ हजार लिटर पाण्याला ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून, पाण्याची राजरोस विक्री होत आहे.
मुंबईत मागील वर्षभरापासून या ना त्या कारणाने पालिकेकडून सातत्याने पाणीकपात होत आहे. आता मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत तातडीच्या दुरुस्ती कामामुळे २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेसह मुंबईत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. मात्र, या दरम्यान अनेक ठिकाणी पाणी उशिरा येण्याच्या, पाणी कमी दाबाने येण्याच्या आणि काही ठिकाणी तर पाणीच येत नसल्याने टँकर मागविण्याच्या तक्रारी आता मुंबईकर करू लागले आहेत.
चारकोपमध्ये नऊ सेक्टर असून, बहुसंख्य सेक्टरमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पूर्वीपेक्षा अर्धा तास पाणी कमी येत असून, पाण्याला दाब नसल्याने पाण्याचा वेग कमी आहे. बोरिवली पूर्व, गोरेगाव पूर्व, अंधेरी पूर्व, चुनाभट्टी तसेच येथील नटवर परिसरातून नागरिक सातत्याने पाण्याच्या तक्रारी करत आहेत.
गळती व चोरी थांबेना एकीकडे पाणी माफिया, तर दुसरीकडे पाणी गळतीचे प्रमाणही मोठे आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, असा दावा जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र, पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २८ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईला दिवसाला फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होतो. पाणी चोरी व गळती रोखण्यात जल विभागाला यश आलेले नाही. वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे या गोष्टी सर्रास सुरू आहेत.
बहुतांश परिसरात दिवसात एक तासच पाणी येते. पाणीकपात असो किंवा नसो, आम्हाला या अडचणींना सामोरे जावे लागते. मोटर लावली तर शेजाऱ्यांची एकमेकांशी भांडणे होतात. शिवाय पाणी यावे म्हणून बहुतांश लोकांनी हॅण्ड पंप लावले आहेत.- संजय घाडी, रहिवासी, गोराई झोपडपट्ट्यांच्या परिसरात सकाळी चार ते सहा या वेळेत पाणी येते, तर सोसायट्यांना दुपारे १२ ते २ या वेळेत पाणी येते. पाणीकपात लागू झाल्यापासून आहे त्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे. मुळात बोरीवलीचा काही परिसर हा डोंगरावर आहे किंवा चढणावर आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतत भेडसावतो. ही समस्या वाढली तर टँकर मागविणे निश्चित आहे. - मनीषा शिंदे, रहिवासी, चारकोप