Join us

पावसाळ्यातच दोन हजारांना टँकर, मग उन्हाळ्यामध्ये काय होणार? कमी दाबाची पाण्याची समस्या सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 2:43 PM

Mumbai: मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या ९६ टक्क्यांवर असला तरी मुंबईच्या अनेक भागांत पाण्याच्या कमी दाबामुळे आणि जलवाहिन्यांअभावी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या ९६ टक्क्यांवर असला तरी मुंबईच्या अनेक भागांत पाण्याच्या कमी दाबामुळे आणि जलवाहिन्यांअभावी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अनेक डोंगराळ  वस्त्यांमध्ये, मढ, मार्वे आणि नॅशनल पार्क, आरेसारख्या आदिवासी पाड्यांत पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे पाणीकपातीचा विषय जरी निघाला तरी येथील स्थानिकांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही.

पावसाळ्यात येथील नागरिकांना २ ते ३ हजार रुपये दराने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात व पाणी कपातीच्या दिवसांत येथील स्थानिक कसे दिवस काढतील हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

पावसाने ओढ दिली की धरण क्षेत्रात कमी पाऊस पडतो आणि पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो. उन्हाळ्यात तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिका प्रशासन विचार करत असले तरी अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे टँकरची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 

... तर राखीव साठ्याचा वापरतलावांतील पाणी साठवणुकीच्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत आठ टक्के साठा राखीव असतो. यंदा पावसाने नियोजित वेळेत हजेरी लावली नाही, तर राखीव साठ्यातून मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यास पुरवठ्याबाबत कोणतेही नियोजन करण्याची गरज भासणार नाही. मात्र, वेळेत पाऊस पडला नाही किंवा दमदार हजेरी लावून पाऊस गायब झाला तर पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

या भागात टँकरची सगळ्यात जास्त मागणी   मुंबईतील गोवंडी- मानखुर्द, अंधेरी पश्चिम, वडाळा, रे रोड, विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, कांदिवली, मालाड, गणपत पाटील नगर, दहिसर येथील झोपडपट्ट्यांत पाण्याची गळती व चोरी जास्त प्रमाणात होत असल्याने  वेळेत पाणी न येणे,  कमी दाबाच्या पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.   येथे पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिक सातत्याने करतात. 

- मुंबईतल्या काही झोपडपट्ट्यांत, व्यापारी संकुले, खासगी टँकर लॉबीकडून पाणी चोरीच्या घटना सुरू आहेतच.- गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया जाते तर दुसरीकडे काही ठिकाणी  पाण्याची गरज असताना टँकर लॉबीचा व्यवसाय तेजीत सुरू असताे.- १००० लीटर पाणी - ५०० ते ७०० रुपये- १ लीटर पाणी - १ रुपयात- पालिकेचा दर - १००० लीटर पाणी - ५ रुपये- अनेक झोपडपट्ट्यांमध्ये १ हजार लीटर पाण्याला ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून पाण्याची राजरोस विक्री होते. 

टॅग्स :पाणीकपातमुंबई