Join us

महापालिकेच्या पाण्यावर टँकरमाफिया गब्बर

By admin | Published: April 21, 2016 3:11 AM

राज्यासह मुंबईत अनेक विभागांत पाण्याची तीव्र टंचाई असताना महापालिकेच्या १८ केंद्रांतून टँकर लॉबीने तीन महिन्यांत ३९ हजार लीटर पाणी पळविले आहे़

मुंबई : राज्यासह मुंबईत अनेक विभागांत पाण्याची तीव्र टंचाई असताना महापालिकेच्या १८ केंद्रांतून टँकर लॉबीने तीन महिन्यांत ३९ हजार लीटर पाणी पळविले आहे़ टँकरमाफिया हे पाणी दामदुप्पट दराने मुंबईकरांना विकून बक्कळ पैसा कमवीत आहेत़ अधिकारी व दलाल यांच्या संगनमताने असा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा पाण्याचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करीत भाजपाने पालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे़एक पैशाला एक लीटर पाणी या दराने टँकर माफिया पाण्याची खरेदी करीत आहेत़ मात्र पालिकेकडून नाममात्र दरात घेतलेले १ लीटर पाणी तब्बल एक रुपयात विकले जात आहे, अशी धक्कादायक बाब भाजपाने उघडकीस आणली आहे़ १ जानेवारी ते १० एप्रिल २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत पालिकेने ३९ हजार लीटर पाणी टँकरमाफियांना विकले़ यामध्ये मानखुर्द, गोवंडी, देवनार या तीन ठिकाणी पालिकेने १३ हजार ४२४ टँकर्सना परवानगी दिली़ पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये पालिका स्वत: किंवा भाड्याचे टँकर उपलब्ध करून पाणीपुरवठा करते़ हा पाणीपुरवठा मोफत असतो़ टँकरवाल्यांना दीडशे रुपयांमध्ये दहा हजार लीटर पिण्याचे पाणी देण्यात येते़ मात्र टँकरमाफिया, पालिकेचे अधिकारी आणि दलाल यांनी संगनमताने पालिकेच्या पाण्याचा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप सत्ताधारी भाजपानेच केला आहे़ (प्रतिनिधी)> अधिकारी व टँकरमाफिया संगनमताने पाण्याची लूट करून करोडोंची कमाई करीत आहेत़ या घोटाळ्याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा हा घोटाळ उघड करू, असे आव्हान देत भाजपाने शिवसेनेला अडचणीत आणले आहे़ परंतु टँकरमाफियांबाबत पहिल्यांदा शिवसेनेनेच स्थायी समितीमध्ये आवाज उठविला होता़ त्यामुळे शिवसेनेचे धोरण उदासीन असल्याचा भाजपाचा आरोप धादांत खोटा असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे़ त्यामुळे उभय पक्षांमध्ये पाणीवाद पेटण्याची चिन्हे आहेत़पालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने शिवसेनेवर तोफच डागली आहे़ त्यामुळे उभय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगात आला आहे़ त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे़ मुंबईत पाणीटंचाई असून टँकरमाफिया हजारो लीटर पाण्याची दामदुप्पट विक्री करीत असताना शिवसेनेचे धोरण उदासीन असल्याचा आरोप भाजपाकडून होऊ लागला आहे़त्यामुळे यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानच भाजपाने दिल्यावर शिवसेनेला धक्काच बसला़ मात्र यावर गप्प न बसता सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे़ टँकरमाफियांचे हे कृत्य सर्वप्रथम शिवसेनेनेच उघड केले होते़ त्यामुळे शिवसेनेवर खोटे आरोप भाजपाने करू नये, असे त्यांनी ठणकावले आहे़१ जानेवारी ते १० एप्रिल २०१६ या काळात शंभर दिवसांमध्ये मुंबईत ४८ हजार १८० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला़ यामध्ये नऊ हजार १८१ टँकर हे पालिकेचे होते़, तर उर्वरित ३९ हजार ९९९ टँकर खासगी होते़पालिका एक लीटरसाठी एक पैसा घेत आहे़ टँकर माफिया मात्र एक लीटर पाणी एक रुपयाला विकत आहे़ दीडशे रुपयांमध्ये टँकरवाल्यांना दहा हजार लीटर पाणी मिळते़या वर्षात पहिल्या शंभर दिवसांत पाच वॉर्डांमध्ये एकही टँकर पुरविण्यात आला नाही़ त्यानंतर आठ वॉर्डांसाठी दोन ते ७० टँकर, मानखुर्द, गोवंडी, देवनार या ठिकाणी लोकांना पाणी देण्यासाठी पालिकेने १३ हजार ४२४ टँकर्सना परवानगी दिली़ एन वॉर्ड घाटकोपरसाठी पाच हजार ९४८, के पूर्व या अंधेरी पूर्व वॉर्डसाठी तीन हजार ९३५ आणि के पश्चिममध्ये जोगेश्वरी ते विलेपार्ले पश्चिम ६४७८ खासगी टँकर पुरविण्यात आले़