मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताचे गैरवर्तवणुकीचे आरोप अभिनेता नाना पाटेकर यांनी फेटाळले. तनुश्रीने नानासह चार जणांविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाच्या नोटीसला उत्तर देताना नानाने सर्व आरोप फेटाळले. शिवाय, हे प्रकरण न्यायालयातच सोडविण्याची भूमिका नानाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष हजर होण्याच्या आयोगाच्या निर्देशाला तनुश्रीने कसलाच प्रतिसाद दिला नसल्याचेही समोर आले आहे.
तनुश्रीने नानाविरोधात केलेल्या आरोपांनंतर भारतात ‘मी टू’ची चळवळ उभी राहिली. तनुश्रीने ८ आॅक्टोबर रोजी महिला आयोगाकडे नाना पाटेकर, निर्माता समी सिद्दिकी, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत आयोगाने ९ आॅक्टोबरला नानासह मुंबई पोलिसांना नोटीस बजावली. तनुश्रीलाही दहा दिवसांत हजर राहून अधिक माहिती देण्यास सांगितले. नानाने वकिलामार्फत १९ आॅक्टोबरला उत्तर दिले. यात आरोप फेटाळतानाच न्यायालयाच्या कक्षेतच सोक्षमोक्ष लावणार असल्याचे नोटिशीत म्हटल्याचे महिला आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नानाचे उत्तर मिळाल्याचे मान्य केले. मात्र, अधिक तपशील देण्यास स्पष्ट नकार दिला. तनुश्रीकडून अद्याप अधिक माहिती मिळाली नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
नानाचे वकील अनिकेत निकम यांनी तनुश्रीचे आरोप निराधार असल्याचे म्हटले. महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तिने वकिलामार्फत पोलीस, आयोगाकडे ४० पानांचा दस्तावेज सादर केला. यात २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नानाने गैरवर्तणूक केल्यानंतर पोलिसांत केलेली तक्रार, टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, बॉलीवूडशी संबंधित अन्य संघटनांसोबतच्या पत्रव्यवहाराचा समावेश आहे.