पॉर्नोग्राफी प्रकरणात सुरतमधून तन्वीर हाश्मीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:28+5:302021-02-11T04:07:28+5:30
गहना वशिष्ठसह तीन आरोपींच्या कोठड़ीत वाढ, तर पाच आरोपींना न्यायालयीन कोठड़ी गहना वशिष्ठसह तीन आरोपींच्या कोठडीत वाढ, तर पाच ...
गहना वशिष्ठसह तीन आरोपींच्या कोठड़ीत वाढ, तर पाच आरोपींना न्यायालयीन कोठड़ी
गहना वशिष्ठसह तीन आरोपींच्या कोठडीत वाढ, तर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्न फिल्म प्रोडक्शन रॅकेट प्रकरणात मालमत्ता कक्षाने सुरत येथून तन्वीर अकील हाश्मी उर्फ टँन (४०) याला अटक केली आहे. तो अश्लील व्हिडीओ ओटीटीवर अपलोड करत होता. त्याची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. त्याला १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मलामत्ता कक्षाने केलेल्या कारवाईत यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकूर (२६), वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापाठोपाठ बुधवारी टँनला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील ही नववी अटक आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत.
तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फिल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
गहनाच्या चौकशीतून गुजरात कनेक्शन उघड होताच पथकाने बुधवारी सुरत येथून तन्वीरला बेड्या ठोकल्या आहेत. तो डायरेक्टर आहे.
तन्वीरने न्यूफ्लिक्स वेबसाईट तयार करून त्यावर अश्लील, नग्न अवस्थेतील व्हिडीओ प्रसारित केले.
बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून रोवासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर गहना, दीपंकर, उमेश कामत यांच्या कोठडीत वाढ करत तन्वीरसह सर्वांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
.....
बँक खाते गोठविले...
रोवा हिचे बँक खाते गोठविण्यात आले असून, मालमत्ता कक्ष अधिक तपास करीत आहे.
....
दुसरा गुन्हाही मालमत्ता कक्षाकडे वर्ग
झारखंडच्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हादेखील मालमत्ता कक्षाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे. यात आणखीन काही तरुणी पुढे येत असल्याची माहिती समजते आहे.
....
व्हिडीओ कोणाला विकले?
यास्मीन, गहना, उमेश आणि दीपंकरने संगनमत करून या अश्लील व्हिडीओंचे शूटिंग करून ते विविध ठिकाणी प्रसारित केले आहेत. त्यांनी हे व्हिडीओ कोणाकोणाला विकले याबाबत मालमत्ता कक्ष अधिक तपास करीत आहे.