गहना वशिष्ठसह तीन आरोपींच्या कोठडीत वाढ; पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्न फिल्म प्रोडक्शन रॅकेट प्रकरणात मालमत्ता कक्षाने सूरत येथून तन्वीर अकील हाश्मी उर्फ टॅन (४०) याला अटक केली. तो अश्लील व्हिडीओ ओटीटीवर अपलोड करायचा. त्याला १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईत यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकूर (२६), वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापाठोपाठ बुधवारी टॅनला अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही नववी अटक आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहिट वेबसाईट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत. तर, दुसरीकडे गहनाने परदेश स्थित कंपनीला विविध अश्लील फिल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
गहनाच्या चौकशीतून गुजरात कनेक्शन उघड होताच पथकाने बुधवारी सूरत येथून तन्वीरला अटक केली. तो डायरेक्टर आहे. तन्वीरने न्यूफ्लिक्स वेबसाईट तयार करून त्यावर अश्लील, विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ प्रसारित केले. बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून रोवासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर गहना, दीपंकर, उमेश कामत यांच्या कोठडीत वाढ करून तन्वीरसह सर्वांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, रोवा हिचे बँक खाते गोठविण्यात आले असून, मालमत्ता कक्ष अधिक तपास करत आहेत.
* व्हिडीओ कोणाला विकले?
यास्मीन, गहना, उमेश आणि दीपंकरने संगनमत करून या अश्लील व्हिडीओचे शुटिंग करून ते विविध ठिकाणी प्रसारित केले आहे. त्यांनी हे व्हिडीओ कोणाकोणाला विकले याबाबत मालमत्ता कक्ष अधिक तपास करत आहेत.
-------------------