मुंबई : ‘मुंबईकरांना उपयुक्त ठरणाऱ्या बेस्टच्या ताब्यात येत्या २ ते ३ वर्षांत दहा हजार अद्ययावत व पर्यावरणपूरक बसचा समावेश असेल,’ असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केले.
मुंबईकरांना ‘बेस्ट’मधून प्रवास करत असताना तिकिटासाठी सुट्या पैशांच्या कटकटीपासून सुटका करणाऱ्या ‘टॅप इन टॅप आऊट’ या डिजिटल सुविधेचे गेटवे ऑफ इंडिया येथे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रवाशांना अशी सुविधा देशात पहिल्यांदा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
यावेळी आदित्य म्हणाले, ‘बेस्टकडून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. त्यामुळे त्या राबविताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २०२४-२५ पर्यंत सुमारे दहा हजार बस घेण्याचे नियोजन आहे. त्यातील बहुतांश बस या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस असतील. त्यामुळे इंधन दरवाढ व पर्यावरणाचा ऱ्हास यापासून सुटका होईल,’ असे ते म्हणाले. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे टायपिंग हे मोबाइल ॲप बनविण्यात आले आहे. त्याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१२ लाख लोकांनी डाऊनलोड केले चलो ॲप. सध्या १२ लाख लोकांनी ‘चलो ॲप’ डाऊनलोड केले आहे, तर २ लाख जणांनी डिजिटल कार्डचा वापर सुरू केला आहे.