तारापोरवाला मत्स्यालयामध्ये आला आॅक्टोपस, पाणसर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 03:16 AM2019-02-10T03:16:02+5:302019-02-10T03:16:25+5:30
तारापोरवाला मत्स्यालयामध्ये माशांसह आता आॅक्टोपस, स्टिंग रे, पफर फिश, पाणसर्प हे नवे पाहुणे आले आहेत. मत्स्यालयात बॉटम शार्क, समुद्र फुल, निमो क्लाऊन फिश, स्टारफिश, लॉस्टर इत्यादी ५० प्रकारचे समुद्र जीव पर्यटकांना लवकरच बघायला मिळणार आहेत.
मुंबई : तारापोरवाला मत्स्यालयामध्ये माशांसह आता आॅक्टोपस, स्टिंग रे, पफर फिश, पाणसर्प हे नवे पाहुणे आले आहेत. मत्स्यालयात बॉटम शार्क, समुद्र फुल, निमो क्लाऊन फिश, स्टारफिश, लॉस्टर इत्यादी ५० प्रकारचे समुद्र जीव पर्यटकांना लवकरच बघायला मिळणार आहेत. मत्स्यालयात शोभिवंत माशांचे प्रजनन करण्यात येणार आहे.
आॅक्टोपस बघण्याकरिता मत्स्यालयाकडे पर्यटकांची वारंवार मागणी सुरू होती. पर्यटकांच्या मागणी आणि हौसेखातर शोभिवंत मासे मत्स्यालयात आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पावसाळ््यामध्ये आॅक्टोपस मिळाला नव्हता. दिवाळीनंतर एका कोळी बांधवाला आॅक्टोपस जाळ््यात सापडला होता. मच्छीमारांनी वाचविलेले हे आॅक्टोपस पर्यटकांना बघण्यासाठी ठेवण्यात आले आहे. समुद्री घोडा आणि पिºहाना मासा पाहण्याची इच्छा पर्यटकांनी व्यक्त केली आहे. समुद्री घोडा आणि पिºहाना मासा लवकर आणण्याचा प्रयत्न मत्स्य विभागाकडून सुरु आहे, अशी माहिती तारापोरवाला मत्स्यालयातील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
मत्स्यालय प्रशासनाने क्लाऊन फिश माशांसाठी खास समुद्री प्रवाळ टाकीमध्ये सोडली आहे.
शरीर फुगवून स्वत:चे संरक्षण करणारा पफर फिश आणि पाणसर्प पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान समुद्र किनारी येणार स्टिंग रेदेखील प्रदर्शन टाक्यांमध्ये सोडले आहे.
काही प्रदर्शन टाक्या खराब झाल्या आहेत़ त्यांचे दुरूस्तीचे काम टप्प्याटप्प्याने प्रशासनाने हाती घेतले आहे. काही आकर्षक समुद्री जिवांचे आगमनही मत्स्यालयात झाले असून आणखी काही समुद्री जीव येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
शोभिवंत माशांची पैदास
मत्स्यालयातील शोभिवंत माशांच्या कक्षामध्ये मोठ्या संख्येने माशांचे प्रजनन होते.
प्रजननाची ही क्षमता लक्षात घेता प्रशासनाकडून काही महिन्यांमध्ये स्वतंत्र मत्स्य प्रजनन कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मत्स्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या रिकाम्या जागेत हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रजनन झालेल्या माशांचा वापर प्रदर्शनासाठी करण्यात येईल.
तारापोरवाला मत्स्यालयात पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी आणि चांगले नामांकित मासे पर्यटकांना दाखविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. माशांमध्ये वेळोवेळी बदल करून पर्यटकांना आकर्षक गोष्टी दाखविल्या जातात. पर्यटकांच्या मागणीप्रमाणे नवे मासे मत्स्यालयात ठेवले जातात. काहींना सापडलेले मासे मत्स्यालयात मोफत दिले जातात.
- अरुण विधळे,
आयुक्त, मत्स्यव्यवसाय