मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांचा पाहणी दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण, कल्याण - कर्जत, दक्षिण पूर्व घाट, कर्जत - पनवेल सेक्शनमध्ये सुरू असलेल्या विविध कामांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी पाहणी केली. त्यावेळी मान्सूनपूर्व कार्याचा वेग वाढविण्यासाठी सांगत त्यांनी पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले. या पाहणी दौऱ्यावेळी मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि अधिकारी उपस्थित होते.
कंसल यांनी मुंबई विभागातील उपनगरीय आणि घाट विभागातील सुरक्षेचे निरीक्षण केले. त्यांनी मान्सूनपूर्व तयारी आणि प्रवासी सुविधांशी संबंधित कामांचा आढावासुद्धा घेतला. त्यांनी यंत्रणेतील सुधारणेच्या मूळ कारणांचे विश्लेषण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
कंसल यांनी विभागांतील विविध सेक्शनमध्ये विनावापर रेल्वे रुळाचा कुठलाही तुकडा पडलेला असू नये म्हणून मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
पावसाळापूर्व कार्याचा वेग वाढविण्यासाठी सांगत सर्व पावसाळ्यापूर्वीची कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांनी दिले. निरीक्षणादरम्यान, त्यांनी फिल्डमधील कर्मचाऱ्यांना नियमित आणि मान्सूनपूर्व कर्तव्यांबाबत जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या. विभागीय अधिकाऱ्यांना नियमितपणे पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी, पादचारी पूल आणि उड्डाणपूल यांचे सुरक्षा ऑडिट करण्यास सांगितले आणि फिल्डमधील व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची चौकशी केली आणि कर्मचाऱ्यांना लस मिळावी, यासाठी प्रत्येक शक्यता तपासून घेण्यास सांगितले. कंसल यांनी निरीक्षणानंतर स्थानकांची स्वच्छता, ड्रोनद्वारे तपासणी यांच्यासह ट्रान्समिशन लाईनची देखभाल पथके, ट्रेन चालण्याची गुणवत्ता व ०.२ जी पेक्षा जास्त श्यून पीक बरोबर ऑसीलेशन मॉनिटरिंग सिस्टीम (ओएमएस) रेकॉर्डिंग यासंदर्भात अवॉर्ड्स जाहीर केले.
.......................................