लैंगिक आकर्षणातून अल्पवयीन मुलींना लक्ष्य; रेहानची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 05:40 AM2018-10-17T05:40:54+5:302018-10-17T05:41:10+5:30
ब्ल्यू फिल्मचा परिणाम : नेहरूनगरमधील दोन्ही गुन्ह्यांत रेहानची कबुली
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मित्रांसोबत ब्ल्यू फिल्म पाहण्याच्या सवयीतून आपले लैंगिक आकर्षण वाढल्याची कबुली रेहान कुरेशीने दिली आहे. या उत्सुकतेमुळेच त्याने २०१० मध्ये कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. या वेळी त्या आरडाओरडा करतील, या भीतीने त्यांचे तोंड आणि गळा दाबल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचीही कबुली त्याने दिली आहे.
पॉक्सोच्या १७ गुन्ह्यांत नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहानने २०१० मध्ये कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येची कबुली दिली. १५ दिवसांच्या अंतरात या घटना घडल्या होत्या; परंतु गुन्हेगाराचा सुगावा लागत नसल्याने आठ वर्षांपासून सीआयडीमार्फत या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या दरम्यान, सदर परिसरातील संशयित ९५८ जणांचे डीएनए नमुने तपासण्यात आले होते. दरम्यान गेल्या महिन्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पॉक्सोचे गुन्हे करणाऱ्या रेहान कुरेशीला गुन्हे शाखा पोलिसांनी शिताफीने अटक केली.
चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र, आजवर तो कोणत्या ठिकाणी राहायला होता, याबाबतच्या चौकशीत त्याच्या नातेवाइकांकडून कुर्ल्याचा उल्लेख वगळला जात होता. मात्र, रेहान कुरेशी हा सहकुटुंब कुर्ल्याच्या कसाईवाडा परिसरात राहिलेला असल्याने २०१० मधील दोन गुन्ह्यांत त्याचा समावेश असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार रेहानचे नमुने डीएनए तपासणीकरिता पाठविले होते. त्यानुसार दोन्ही अल्पवयीन मुलींवर रेहाननेच बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले असता, अधिक चौकशीत त्याने कबुली दिली.
संधी मिळेल तेव्हा करे बलात्कार
रेहानला मित्रांच्या संगतीमुळे ब्ल्यू फिल्म पाहण्याची सवय लागली होती. यामुळे त्याच्यात लैंगिक आकर्षण वाढत गेले; परंतु मोठ्या मुलींसोबत शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केल्यास पकडले जाण्याच्या भीतीने त्याने लहान मुलींना लक्ष्य केले. यानुसार त्याने पाच वर्षांच्या मुलीला पोलीस कॉलनीतल्या इमारतीच्या छतावर नेले; परंतु बलात्कार करते वेळी ती ओरडू नये, म्हणून तोंड दाबले असता तिचा मृत्यू झाला. यानंतरही त्याने १५ दिवसांतच दुसरा गुन्हा केला. त्या वेळीही गळा आवळला गेल्याने मुलीचा मृत्यू झाला.
या गुन्ह्यात पोलीस परिसरातील मुलांचे डीएनए तपासत असल्याचे समजताच अनेक महिने तो घरातच लपून होता, त्यानंतर काही महिन्यांत त्यांनी राहण्याचे ठिकाण बदलल्याने तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. मात्र, वाढत्या वयानुसार त्याच्यातले लैंगिक आकर्षण वाढत गेल्याने तो संधी मिळेल, त्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा. यानुसार दोन वर्षांत मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई व पालघर परिसरातले १७ व नेहरूनगरमधील २ असे १९ गुन्हे उघडकीस आल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.