आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण

By सचिन लुंगसे | Published: January 4, 2024 01:57 PM2024-01-04T13:57:11+5:302024-01-04T13:57:51+5:30

महाराष्ट्रात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसल्याचे आढळलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला.

target of power supply to primitive tribes completed in twelve days | आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ बारा दिवसात पूर्ण केले. महावितरणच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात आदीम जमातींची २,४५४ घरे नव वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत उजळण्यात यश मिळाले आहे.

आदीम जमातींसाठी राज्यात विविध विभागांमार्फत १५ नोव्हेंबर २०२३ पासून कार्यवाही सुरू झाली. महाराष्ट्रात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसल्याचे आढळलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला.

आदिम जमातींना घर, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, गॅस कनेक्शन आदी ११ प्राधान्य क्षेत्रांची सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. कातकरी, कोलम, माडिया गोंड इत्यादी महाराष्ट्रातील आदिम जमातींच्या वस्त्यांमध्ये त्यानुसार काम करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महावितरणला वीज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले. 

महावितरणला उपलब्ध झालेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर, नांदेड, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग, यवतमाळ जिल्ह्यात तसेच वसई परिसरात स्वातंत्र्यानंतर अजूनही वीज पुरवठा मिळाला नसलेली आदिम जमातीची २३९५ घरे आढळली. या घरांना वीज पुरवठा करतानाच योजनेच्या तरतुदीत बसणाऱ्या आणखी ७३ लाभार्थ्यांना रायगड जिल्ह्यात वीज पुरवठा करण्यात आला.

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगावच्या अशोक दगडू हिलम यांच्या घरी या योजनेत पहिल्यांदाच वीज आली. त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी घरी वीज कनेक्शन आले. त्यासाठी अर्ज केला नव्हता. सरकारने स्वतःहून कनेक्शन दिले. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी वीज आली. वस्तीमधील पंधरा कुटुंबे इतकी वर्षे अंधारात होती. संपूर्ण वस्तीला वीज मिळाली. “घरी वीज येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. महावितरणचे धन्यवाद,” अशोक हिलम सांगतात.

नांदेड 

नांदेड जिल्ह्यातील माहूर गावच्या अशोक कवडू आडे यांच्याही वस्तीला गेल्या दोन दिवसात वीज मिळाली. ते म्हणाले की, किनवटच्या आदिवासी कार्यालयाचे अधिकारी स्वतः लाईनमनला घेऊन आले आणि त्यांनी वीज जोडून दिली. मजुरी करणाऱ्या अशोक आडे यांची घरी वीज आल्यानंतरची प्रतिक्रिया, चांगले वाटले अशी होती.

Web Title: target of power supply to primitive tribes completed in twelve days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज