Join us

कर्तव्य बजावणाऱ्यांनाच करताहेत टार्गेट : शिवाजी नगरमध्ये पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 7:35 PM

धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविन्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबुने मारहाण केल्याची घटना घडली.

मुंबई : धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविन्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबुने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कर्तव्य बजावणाऱ्यांनाच  टार्गेट केले जात असल्याचे चित्र मुंबईत पहावयास मिळते आहेत.

शिवाजी नगर परिसरात बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गस्त घालत असताना काही  जण घोळका करून उभे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना बांबुने मारहाण केली. ही बाब अन्य कर्मचाऱ्यांना मिळताच जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी या चौकड़ीतील वाजीद शेख आणि सलमान उर्फ सुल्ली या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

यापुर्वी धारावी पोलिस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई बुधवारी सायंकाळी जोगळेकर नाला रोड परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान ओमदत्त सोसायटीजवळ सात ते आठ जण विनाकारण घोळका करून असताना पोलिसांनी या तरुणांना हटकले. जमावबंदी असतानाही हे तरुण जात नसल्याने पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच या तरुणांनी  पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्या आधारे धारावी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला.

 तर भेंडीबाजार येथेही मंगळवारी रात्री नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका विनाकारण भटकणाऱ्या दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी चालकाने न थांबता पोलिसालाच फरफटत नेल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  त्यामुळे एकीकडे स्वतःसह कुटुंबियाच्या जीवाची पर्वा न करता केवळ मुंबईकरांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असाणाऱ्या पोलिसांचा आदर करण्याऐवजी त्यांना मारहाण होणे चूकीचे असल्याचे पोलीस कुटुंबियाचे म्हणणे आहे. 

…...............................

आरोपींचा आकड़ा १५०० पार 

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक म्हणून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २० मार्च ते २ एप्रिल पर्यंत १५२६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ११९४ जणांवर अटकेची कारवाई करत त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले आहेत. यापैकी २२४  नोटिस देवून सोडून देण्यात आले आहे. कोरोनाचे संशयिताविरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर , हॉटेल आस्थापना २५, पान टपरी १६, इतर दुकाने ५७, हॉकर्स/ फेरीवाले २२, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ३९२ तर अवैध वाहतूक प्रकरणी २७५ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.

--------------------

डोंगरीतही परदेशी नागरिकाकड़ून पोलिसांना मारहाण डोंगरीतील शाह बाबा दर्गाह येथे गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांना मारहाण करत त्यांच्या अंगावर थूंकल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा यमन देशाचा नागरिक असून त्याला वरीष्ठांच्या आदेशाने त्याच्या वडिलांच्या ताबयात देण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई