मुंबई - साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात उदयनराजेंनी नरेंद्र मोदींना पगडी परिधान करुन त्यांचं स्वागत केलं. तर, मोदींनी उदयनराजेंचा हात उंचावत अभिवादन केलं. तसेच, उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचंही त्यांनी कौतुक केलं असून छत्रपती शिवाजी महाराजांची पगडी ही जबाबदारी असल्याचं मोदींनी म्हटलं. मात्र, मोदींना हार परिधान करतेवेळी उदयनराजेंना डावलल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. या फोटोवरुन राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदनयराचेंना लक्ष्य केलंय.
उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर, मोदींनीही उदयनराजेंचं भाजपात स्वागत करताना, आनंद व्यक्त केला. तसेच आज माझ्या जीवनाचा अमूल्य दिवस आहे कारण छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर पगडी ठेवली. शिवराय यांच्याविषयी माझे दायित्व आहे या पगडीचा सन्मान राखण्यासाठी माझं आयुष्य देऊ शकेल त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुष्पहार-सत्कारावेळी मोदींसमेवत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिसत आहेत. तर, उदयनराजे हे मागील बाजूस दिसून येतात. या फोटोवरुन जितेंद्र आव्हाड यांनी उदनयराजेंना लक्ष्य केलंय.
राजे यातना होतात हे बघून ..... 5,000 मनसबदारी वर लाथ मारली होती आमच्या धन्यांनी, राजे... असे म्हणत उदयनराजेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेब बादशहा भेटीची आठवण करुन दिली आहे. या ट्विटसोबत आव्हाड यांनी उदयनराजेंचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटोही शेअर केला आहे. तर त्याचखाली उदयनराजे आणि खासदार शरद पवार यांचाही एक फोटो शेअर केला आहे.