Join us

धारावीत एका महिन्यात एक लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

मुंबई : धारावीच्या झोपडपट्टीच्या वस्ती लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पालिकेच्या जी-उत्तर विभागाने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या ...

मुंबई : धारावीच्या झोपडपट्टीच्या वस्ती लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पालिकेच्या जी-उत्तर विभागाने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत एक लाख धारावीकरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

धारावीतील एक लाख लोकांना एका महिन्यात लस देण्याचे उद्दिष्ट ठेवत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीएसआर फंडाअंतर्गत एक लाख लोकांना दोन्ही डोस देत कोरोनापासून सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात पालिका पूर्ण सहकार्य करणार आहे. पालिकेकडून त्यांना लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यासह, महापालिकेने स्वतः लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दिघावकर यांनी सांगितले, मंगळवारी पहिल्या दिवशी ५०० लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. दररोज एका केंद्रातून १५०० ते ३ हजार नागरिकांना कोरोना लस दिली जाईल.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात धारावीत कोरोनाचा शिरकाव झाला. धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणार अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु योग्य उपचार पद्धती यामुळे धारावीत कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्यात पालिकेला यश आले. तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने सुरू केला आहे.