Join us

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा, अजित पवारांनी विधानसभेतच सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 8:42 AM

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते. तर, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासूनच कोविडचा काळ सुरू झाला. त्यात, उद्धव ठाकरेंचे आजारपणही होते. त्यामुळे, फिल्डवर अजित पवार हेच काम पाहात. मात्र, आता अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपाच्या रांगेत खुर्ची मांडली आहे. त्यामुळे, विधानसभेतील चर्चेत बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी, उपमुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे अभिनंदनही केले होते. मात्र, अजित पवार यांनी विधानसभेतील चर्चेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत एक किस्सा सांगितला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी उपमुख्यमंत्री होतो. त्यावेळी, देशाचे एकेकाळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार होता. खासदार गोपाळ शेट्टींच्या मतदारसंघात हा पुतळा उभारणार होता. मी त्यासंदर्भात बैठक घेतली, विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे व्हीसीद्वारे हजर होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही त्यावेळेस व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित होते. आम्ही म्हणालो की, या पुतळ्याला परवानगी द्या, परंतु वाजपेयी साहेबांच्या पुतळ्याला काहींनी परवानगी नाकारली. या गोष्टीचा मला खेद वाटतो, असे म्हणत अजित पवार यांनी थेट नाव घेण्याचे टाळत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य आपणा सर्वांना माहिती आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्यासारखेच ते महान होते, असेही अजित पवार यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्यात ऑलिंपिक भवन उभारण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला. त्यासाठी, सर्व मंजुरीही देण्यात आल्या. मात्र, तेही काहींनी थांबवलं, वास्तविक असं कुणीही करू नये. कारण, ज्यावेळी दुसऱ्यांकडून आपण सकारात्मक भूमिकेचं मत मांडतो, त्यावेळी आपणही थोडसं आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करावं. मराठीत एक म्हण आहे, ४ दिवस सासूचे असतात, तर ४ दिवस सुनेचेही येत असतात, असा टोलाही अजित पवारांनी थेट विधानसभेतूनच लगावला. 

अजित पवारांबद्दल काय म्हणाले होते ठाकरे

''अजित पवारांनी अडीज वर्षे माझ्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्यामुळे लोकांना वेळेवर मदत मिळेल. कारण, त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा दिल्या गेल्या आहेत,'' असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला होता. तर, ज्या अजित पवारांमुळे शिवसेनेचा एक गट गुवाहाटीला गेला, आता तेच अजित पवार सत्तेत आले आहेत. मग खरं कोण आणि खोटं कोण या प्रश्नावर हे समजायला जनता मुर्ख नाही, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटले होते.  

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीविधान भवन