धोकादायक इमारती खाली करण्याचे लक्ष्य: रहिवाशांच्या विरोधामुळे कामाला गती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:32 AM2017-09-09T03:32:43+5:302017-09-09T03:33:01+5:30
मुंबईत गेल्या महिन्याभरात दोन इमारती कोसळून पन्नास रहिवाशांचे बळी गेले आहेत. यामुळे टीकेचे धनी बनावे लागल्याने, झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : मुंबईत गेल्या महिन्याभरात दोन इमारती कोसळून पन्नास रहिवाशांचे बळी गेले आहेत. यामुळे टीकेचे धनी बनावे लागल्याने, झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी रहिवासी विरोध करीत असल्याने, अद्याप सुमारे पाचशे इमारतींतील रहिवासी मृत्यूच्या छायेत आहेत. त्यामुळे संबंधित इमारतींचे पदाधिकारी, रहिवासी यांची तातडीने बैठक घेऊन, त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्व सहायक आयुक्तांवर टाकण्यात आली आहे.
घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत व भेंडी बाजारातील हुसैनी इमारत दुर्घटनेमुळे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ६४२ इमारती धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. मात्र, यापैकी २२ धोकादायक इमारतीच आतापर्यंत पाडण्यात आल्या असून, उर्वरित सुमारे पाचशे इमारतींमधील रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
शुक्रवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत याची दखल घेऊन, आयुक्तांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतले.
मुंबईत असलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी, सर्व विभागांनी संबंधित इमारतीचे पदाधिकारी, रहिवासी यांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे. त्यातील धोके त्यांना समजावून सांगावे, तसेच जनप्रबोधनासाठी पालिकेच्या वतीने करण्यात आलेले पोस्टर्सही या इमारतींमध्ये लावण्यात यावे.
त्यासाठी सर्व विभागांनी आपल्या भागात विशेष मोहीम राबवावी,
असे त्यांनी अधिकारी वर्गाला बजावले.