Join us

तारिक परवीनला मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:06 AM

डी कंपनीला धक्का : मुंब्रा येथील खून प्रकरणात होता फरार

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री मुंबईतून अटक केली. २0 वर्षांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या एका खून प्रकरणामध्ये तो फरार होता. दाऊदच्या साम्राज्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.साधारणत: २0 वर्षांपूर्वी केबल व्यवसाय तेजीत होता. या व्यावसायिक स्पर्धेतून ३१ आॅगस्ट १९९८ रोजी मुंब्रा येथील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दिकी मोहम्मद उमर बांगडीवाला यांचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. एक गोळी रोशन आरा नावाच्या १३ वर्षांच्या मुलीला चुकून लागल्याने तीदेखील जखमी झाली होती. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी तारिक परवीनसह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तारिक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकादेखील केली होती. या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये तारिक परवीनला फरार दाखविण्यात आले होते. या घटनेला जवळपास २0 वर्षे उलटल्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास तारिकला मुंबईतील एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमधून अटक केली. गेल्या काही वर्षांपासून तो रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये त्याने कार्यालय थाटले होते. खंडणीविरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, विकास बाबर, विलास कुटे, संदेश गावंड, प्रशांत भुरके यांनी ही कामगिरी केली.

छोटा शकीलचा उजवा हातदाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचा उजवा हात म्हणून तारिक परवीनला ओळखले जाते. १९९४ साली तारिकचा भाऊ झुबेर हा गुजरात पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून फिरोज कोकणीने त्याचा खून केला होता. कालांतराने तारिक छोटा शकीलच्या टोळीत सहभागी झाला. तारिकची अटक हा दाऊद आणि छोटा शकीलला मोठा हादरा मानला जात आहे.

१. क्रॉफर्ड मार्केट येथील सारा-सहारा शॉपिंग सेंटरच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणातील आरोपींमध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि तारिक परवीन यांचाही समावेश होता. या प्रकरणामध्ये इक्बाल कासकरचे २00३ साली तर तारिकचे २00४ साली दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. २00७ साली मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयाने तारिकला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. जवळपास एक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

२. मध्यंतरीच्या काळात तारिक परवीनने रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात पाय रोवले. दाऊद इब्राहिमच्या पायधुनी येथील एका इमारतीचा पुनर्विकासही तारिकने केला होता. एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये कार्यालय तर क्रॉफर्ड मार्केटमधील सारंग स्ट्रीटमध्ये त्याचे वास्तव्य होते.

टॅग्स :गुन्हा