Join us

तासगावकर कॉलेजच्या संस्थाचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:48 AM

८६ लाखांची फसवणूक; भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांकडून अपहार केल्याचा ठपका

मुंबई : १७ महिने प्रलंबित वेतन प्रकरणी वादग्रस्त तासगावकर कॅम्पसचे संस्थाचालक अध्यक्ष तासगावकर यांच्यावर भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये ८६ लाखांच्या रकमेच्या अपहार प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संस्थाचालकांसोबत त्यांच्या कुटुंबीयांची नावेही असल्याचे समोर आले आहे.सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे कर्जत तालुक्यात यादवराव तासगावकर इन्स्टिट्युट आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, तासगावकर पॉलिटेक्निक आणि यादवराव तासगावकर आणि स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेंट अशी तीन महाविद्यालये आहेत. महाविद्यालयातील २९१ कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर्मचारी भविष्य निधी खाते क्रमांक-१ आणि कर्मचारी निवृत्तिवेतन योजना खाते क्रमांक-१०मध्ये भरणे आवश्यक होते. मात्र संस्थाचालक व ट्रस्टी यांच्या संगनमताने जुलै २०१३ ते मार्च २०१७ यादरम्यान कर्जत तालुक्यातील या कॉलेजमधील कर्मचाºयांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. कुटुंबातील नावे हजेरी पटावर दाखवून मान्यता घ्यायची, फी वाढवून घ्यायची, ती वसूल झाल्यावर कर्मचाºयांचे वेतन करायचे नाही आणि वर शासनाचे समाज कल्याण खाते पैसे देत नाही म्हणत ओरड करायची असा आरोप त्यांच्यावर मुक्ता शिक्षक संघटनेने केला आहे.मुक्ता शिक्षक संघटनेने केलेले आरोप तसेच शिक्षकांच्या तक्रारींची दखल घेत अखेर भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये ८६ लाखांच्या रकमेच्या अपहार प्रकरणी संस्थाचलकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :धोकेबाजी