कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी टास्क फोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:39 PM2020-04-29T18:39:38+5:302020-04-29T18:40:09+5:30
नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी येथे टास्क फोर्स शिवसेनेने कार्यान्वित केला आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : वर्सोवा गावातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या वाढू नये आणि या विभागातील नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी येथे टास्क फोर्स शिवसेनेने कार्यान्वित केला आहे.
शिवसेना सुरवातीपासूनच येथे कोरोना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.विभागात पक्षीय उच्चस्तरावरून मदत मिळावी म्हणून परिवहन व संसदीय कार्यमंत्री, विभागप्रमुख अनिल परब, व स्थानिक शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्याशी संपर्क साधून शासकीय व महापालिका स्तरावर मदत मिळविण्यासाठी सतत सूचना करत आहेत. त्या निमित्ताने नुकतेच गजानन कीर्तिकर यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रसाद जोशी यांना विभागात आढावा घेण्यासाठी पाठवून, त्यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना वर्सोवा गावातील वाढत्या करोना रूग्णांचा आकडा हा चिंताजनक असून आयुक्त म्हणून त्वरित लक्ष घालण्याची विनंती पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना वर्सोवा उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी लोकमतला दिली. तसेच यासंबंधीची तक्रार अँड. अनिल परब यांच्याकडे यांनी केली असता त्यांनी या मध्ये शासन त्वरीत लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील डॉक्टरांच्या उपस्थितीत प्राचार्य व शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत नुकतीच महत्वाची बैठक झाली. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, व गावातील संस्थेचे पदाधिकारी महेंद्र लाडगे, सचिन चिंचये, राजहंस टपके, स्वतः अजय कौल, डॉ आदिल, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये विभागातील डॉक्टरांना त्याचे दवाखाने सुरू करण्यासाठी आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या संभाव्य तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते करण्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी नगरसेविका प्रतिमा खोपडे यांच्या सोबत मान्य केले. त्यांना जर सुरक्षा किट देण्याची अजय कौल सरानी तयारी सदर बैठकीत दर्शवली. नगरसेविका खोपडे, शाखाप्रमुख सतिश परब, आणि विभागातील सर्व उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते यांनी लाॅकडाऊन च्या पार्श्वभूमीवर खास करून वर्सोवा विभागातील स्लम विभागात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पक्षीय स्तरावर स्वत:चा जीव धोक्यात घालून मेहनत करत असल्याची माहिती शेवटी शेट्ये यांनी दिली.