पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास टास्क फोर्सचा हिरवा कंदिल; मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:07 PM2021-11-24T13:07:05+5:302021-11-24T13:12:57+5:30
प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि निवासी शाळा सुरू करता येतील असा सल्ला टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात ८ ते १२ वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू कऱण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात टास्क फोर्सने सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. मंगळवारी रात्री टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली असून सदर बैठकीत टास्क फोर्स समितीतील सदस्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास संमती दिली आहे.त्यामुळे लवकरच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि निवासी शाळा सुरू करता येतील असा सल्ला टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे. या शिवाय शाळा सुरू करताना पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या आहेत. निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा टप्प्याटप्याने सुरू कराव्यात की सरसकट सुरू कराव्यात हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून स्थानिक पातळीवरील तयारी पाहूनच घ्यावा असे सल्ला ही टास्क फोर्सने दिला असल्याची माहिती मिळत आहे.