मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचा कारभार आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:52 AM2019-11-20T03:52:30+5:302019-11-20T06:25:06+5:30
केईएम रुग्णालयातील दुर्घटनेनंतर निर्णय; समन्वय, तक्रार, सुधारणांसाठी काम करणार
मुंबई : केईएम रुग्णालयातील दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केईएम, सायन, नायर सर्वसाधारण आणि नायर दंत रुग्णालय, तसेच कूपर रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी अंतरिम स्वरूपात तीन सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. हे अधिकारी रुग्णालयांमधील परिस्थितीचा अहवाल अधिष्ठात्यांना देऊन आवश्यक सुधारणा करून घेणार आहेत.
७ नोव्हेंबर रोजी परळ येथील केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन महिन्यांच्या प्रिन्सला आपला हात गमवावा लागला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. पालिका रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, केईएमच्या अधिष्ठातांच्या निलंबनाचीही मागणी होत आहे. त्यानंतर, आता सुपरस्पेशालिटी रुग्णालयांमधील प्रशासकीय कामकाजाकरिता सीईओ नेमण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी महासभेत जाहीर केले होते.
त्यानुसार, एकाच आठवड्यात केईएम, नायर, सायन आणि कूपर या बहुउद्देशी रुग्णालयांमध्ये सीईओ नेमण्यात आले आहेत. केईएम आणि सायन रुग्णालयासाठी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिग्गावकर, कूपर रुग्णालयासाठी के पूर्वचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे आणि नायर सर्वसाधारण व नायर दंत रुग्णालयासाठी पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांची सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांमधील गैरसोयी, दुर्घटना आणि डॉक्टर-नातेवाइकांचा वाद टाळण्यासाठी ते काम करणार आहेत.
अशी असेल जबाबदारी
रुग्णालयाशी संबंधित सर्व प्रशासकीय कामकाज, किरकोळ नागरी, यांत्रिकी आणि विद्युत संबंधीच्या दुरुस्त्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी सीईओवर असणार आहे. रुग्णालयातील अभियांत्रिकी आणि प्रशासकीय विभाग सीईओच्या अखत्यारित येणार आहेत. दर आठवड्याला रुग्णालयातील नागरी, यांत्रिकी आणि विद्युत कामाचा आढावा घेण्यासाठी सीईओला एकदा हजेरी लावावी लागणार आहे.
यासाठी केली नियुक्ती : प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज येणाºया रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात असते. वैद्यकीय कर्मचारी वर्ग त्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्यावर आधीपासूनच कामाचा ताण आहे. त्यात नादुरुस्त यंत्र आणि बंद विद्युत उपकरणांची दुरुस्ती करून घेणे, नवीन खरेदी करणे, अशा बाबींमध्ये त्यांचा वेळ अधिक वाया जातो. त्यामुळे अशा प्रशासकीय कामाकाजांसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा पालिकेचा मानस होता.
यापूर्वीच्या दुर्घटना
जानेवारी २०१८ : नायर रुग्णालयात नातेवाईकाला पाहण्यासाठी गेलेल्या राजेश मारू या तरुणाचा एमआरआय मशीनमध्ये ओढला गेल्याने मृत्यू झाला.
जानेवारी २०१९ : जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात रुग्णांवर झालेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत तीन रुग्णांची दृष्टी गेली.
७ नोव्हेंबर २०१९ : ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन महिन्यांचा बालक भाजला. यात त्याचा एक हात निकामी झाला.