मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरीदेखील महागाईला सामान्य जनतेला सामोरे जावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा पूर्वीप्रमाणे आवक-जावक होत आहे. मात्र मसाल्याचे दर प्रचंड वाढलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे आता गृहिणींच्या स्वयंपाकाचे बजेट वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात कर्नाटक व केरळमधून मोठ्या प्रमाणात मसाल्यांची आवक होते. लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या वतीने वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे मसाल्याची लागवड करूनदेखील त्याची आवक बाजार समित्यांमध्ये झाली नाही. लॉकडाऊनमुळे ग्राहकांनीदेखील बाजारांकडे पाठ फिरवल्याने मसाल्याची विक्रीदेखील मंदावली होती. तसेच मागील काही महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्याने आता मसाल्यांचे दर वाढले आहेत.
असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
हळकुंड १३० १६०
शहाजीरे ४०० ५५०
वेलची ३,००० ४,०००
काळी मिरी ४५० ४५०
जिरे ४०० ५५०
दालचिनी ३५० ४५०
लवंग ६०० ८५०
चक्रीफुल ७०० ९५०
तमालपत्र १४० १६०
महागाई पाठ सोडेना!
कोरोनामुळे आधीच घरातली आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात आता इंधनाच्या दरवाढीसोबतच भाज्या, फळे व मसाल्याची दरवाढ झाल्याने काहीच बचत होत नाही.
- स्वाती घाग
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता पुन्हा महागाईने डोके वर काढले आहे. यामुळे समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. महागाई अशीच वाढत राहिली तर सामान्य नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील.
- गीता पाखरे
म्हणून वाढले दर
मागील काही महिन्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला. तसेच पूरपरिस्थितीमुळे दुसऱ्या राज्यातून मसाल्यांची आवकदेखील घटली आहे. त्याचा थेट परिणाम मसाल्यांच्या किमतीवर झाला आहे.
- कुमार सिंग (व्यापारी)
स्टार १०६७