Join us

टाटा आणि अदानीचा वीजचोरांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईमुंबई शहर आणि उपनगरात विजेचा गैरवापर करण्याच्या घटना घडतच असून, विजेच्या मीटरमध्ये फेरफार करणे किंवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

मुंबई शहर आणि उपनगरात विजेचा गैरवापर करण्याच्या घटना घडतच असून, विजेच्या मीटरमध्ये फेरफार करणे किंवा चोरीची वीज वापरणे; अशा घटना सातत्याने घडत असतात. मात्र, अशा वीजचोरांना शॉक देण्यासाठी टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीसारख्या मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या सातत्याने मोहिमा राबवीत असून, विजेच्या चोरीला आळा बसावा, मीटरमधील फेरफारीला आळा बसावा म्हणून कार्यरत आहेत.

टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत विजेच्या मीटरमध्ये फेरफार करण्याच्या घटनांची नोंद झालेली नाही. मात्र, मीटरविना वीज वापरणाऱ्या म्हणजे विजेची चोरी करणाऱ्या प्रकरणांची नोंद झाली आहे. मीटर बॉडी ब्रेक होणे. मीटर जळणे. उच्च दाबामुळे अडचणी येणे आणि इतर अनेक अडचणी, धोके किंवा आव्हाने आहेत. परंतु, यावर वेळच्या वेळी तोडगा काढला जातो. समजा मीटरमध्ये कोणी फेरफार केलेच तर १३५ कलमानुसार कारवाई केली जाते. शिवाय सदर ग्राहकाला वापरलेल्या विजेचे बिल आकारले जाते. जर समजा त्याने याबाबत सहकार्य केले नाही किंवा आकारलेले वीज बिल भरले नाही तर एफआयआर नोंदविला जातो.

अदानी इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांचा विचार करता म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान मीटरमधील फेरफारीच्या ६६ प्रकरणांची नोंद झाली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मीटरमध्ये फेरफार केले जातात. मीटर बायपास केले जातात किंवा इतर डिव्हाइसद्वारे मीटरमध्ये फेरफार केले जातात. शिवाय विजेचा वापर कमी नोंदविण्यात यावा याकरिता रिमोटचादेखील वापर केला जातो. अशा प्रकरणांत पहिल्यांदा घटनास्थळाहून पुरावे गोळा केले जातात. घटनास्थळी तपासणी केली जाते. कायद्यामधील कोणत्या तरतुदीनुसार काय कारवाई करता येईल? याबाबत भूमिका घेतली जाते, तशी कारवाईदेखील केली जाते. विजेची चोरी होऊ नये. विजेच्या मीटरमध्ये फेरफार होऊ नये, म्हणून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम हाती घेतली जाते. कायद्यानुसार कारवाई केली जाते. याकामी पोलिसांचे सहकार्यदेखील लाभते.