मौखिक कर्करोगाविरुद्ध टाटा व आयडीए एकत्र, भारतातील पहिला डीजिटल उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:42 AM2017-08-24T00:42:33+5:302017-08-24T00:43:16+5:30
तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक स्तरावरील निदान आणि प्रतिबंधासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) यांनी भारतातील पहिला डीजिटल उपक्रम सुरू केला आहे.
मुंबई : तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक स्तरावरील निदान आणि प्रतिबंधासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) यांनी भारतातील पहिला डीजिटल उपक्रम सुरू केला आहे.
जागतिक स्तरावर विचार करता मौखिक कर्करोग हा सहाव्या क्रमांकावर आहे आणि साधारण ३ लाख रुग्ण त्याने पीडित आहेत. त्यातील ८६ टक्के भारतात असून, त्याचे निदान व त्यावर प्रतिबंध आवश्यक आहे. त्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर आणि इंडियन आयडीए यांनी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारातून मौखिक कर्करोगाबाबत जागृती आणि प्राथमिक स्तरावर निदान व तपासणी करणे या गोष्टी साधल्या जाणार आहेत. मौखिक पोकळीमधील रोगपूर्व व्रणावरील (प्री मॅलिग्नंट लेसन इन ओरल कॅव्हिटी) हा पहिला डीजिटल उपक्रम आहे. याउपक्रमाद्वारे तोंडाच्या कर्करोगाविषयी माहिती मिळेल. तसेच तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान कसे करता येईल आणि तो ओळखण्यासाठी व टाळण्यासाठी काय उपाय आणि मार्ग अनुसरावे याचेही मार्गदर्शन असेल. मौखिक कर्करोग प्रामुख्याने दारू, सुपारी आणि तंबाखू यामुळे होतो. आयडीए ही मान्यताप्राप्त अशी संघटना २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. तिच्या ४५० हूनही अधिक शाखा आहेत. आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी ही माहिती दिली.