Join us

विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी प्राध्यापक अर्जुन सेनगुप्ता यांना TISSची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:24 PM

संस्थेच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी टाटा समाजविज्ञान संस्थेने डॉ. अर्जुन सेनगुप्ता या प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संस्थेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी निलंबित का करू नये, अशी विचारणा नोटिशीत केली आहे, तर संस्थेच्या या निर्णयाला टीस टीचर्स असोसिएशनने विरोध केला आहे.

‘टीआयएसएस’ ( Tata Institute of Social Sciences ) संस्थेच्या हैदराबाद कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात डॉ. सेनगुप्ता सहभागी झाल्याचे इन्टाग्राम या समाज माध्यमावरील व्हिडीओत दिसत आहे. डॉ. सेनगुप्ता यांच्या या कृतीमुळे संस्थेच्या नियमांचा भंग झाला असल्याने नोटीस बजावण्यात आल्याचे टीआयएसएस प्रशासनाने म्हटले आहे. या आंदोलनात जवळपास २० विद्यार्थी हातात प्ले-कार्ड घेऊन उभे होते.

दरम्यान, टीस टीचर्स असोसिएशनने निवेदनाद्वारे संस्थेच्या नोटिशीला विरोध केला आहे. कोणतीही खातरजमा न केलेल्या चित्रफितीवरून टीआयएसएस प्रशासनाने डॉ. सेनगुप्ता यांना नोटीस बजावली आहे. ती तात्काळ मागे घेण्यात यावी. शैक्षणिक स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी आणि संस्थेत सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करावे आदी मागण्याही असोसिएशनने केल्या आहेत.

नियम काय?

संस्थेतील कर्मचाऱ्यांनी राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमात संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय सहभागी होऊ नये. तसेच सार्वजनिक चर्चासत्रात आणि मास मीडियामध्ये  संस्थेच्या धोरणांवर टीकाही करू नये, असा नियम आहे. या नियमांचा भंग करणारी कृती केल्याने पदावरून निलंबित का करू नये, अशी नोटीस डॉ. सेनगुप्ता यांना बजावण्यात आली आहे.

टॅग्स :टाटाविद्यार्थी