टाटा मोटर्समध्ये आता ‘साम्य’वादाचा अंमल
By admin | Published: June 10, 2017 03:30 AM2017-06-10T03:30:37+5:302017-06-10T03:30:37+5:30
देशातील सर्वांत मोठी आॅटोमोबाइल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सर्वांत मोठी आॅटोमोबाइल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत टीमवर्कला वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे सर्व कर्मचारी एकाच स्तरावर (समान) येणार आहेत. कंपनीत यापुढे कोणीही बॉस नसेल आणि सर्व जण केवळ कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदे बरखास्त करण्यात येणार आहेत.
कंपनीने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे पद आणि पदानुक्रमाचा विचार न करता काम करण्याची सर्वांना संधी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. टाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे.
तरुण कर्मचाऱ्यांना आनंद-
कंपनीतील प्रत्येक टीमच्या प्रमुखाला ‘हेड’ असे पद देण्यात येईल; आणि त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव आणि कामाचा किंवा डिपोर्टमेंटचा उल्लेख असेल.
या निर्णयामुळे सध्याच्या १४ पदांची संख्या पाचवर येईल. यामुळे ग्लोबल कंपन्यांत, विशेषत: सर्व्हिस एजन्सींमध्ये असणारी कामाची संस्कृती आपल्याकडे रुजू होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे कर्मचारी पदावर लक्ष केंद्रित न करता केवळ कामाकडे लक्ष देतील, असा विश्वास टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे.
यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया बंद होईल आणि झालीच तर ती कंपनीत नोकरी उपलब्ध असल्यास होईल, असे सांगण्यात आले. या निर्णयावर कर्मचाऱ्यानी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, तरुण कर्मचारी अधिक आनंदी दिसत आहेत.