‘टाटा पॉवर’च्या वीज दरात एप्रिलपासून वाढ, मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:53 AM2024-03-08T09:53:01+5:302024-03-08T09:54:45+5:30
मुंबई शहरासह उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या वीज दरात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे.
मुंबई :मुंबई शहरासह उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या वीज दरात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. ‘टाटा पॉवर’च्या थेट ग्राहकांना हा वीज दरवाढीचा फटका बसणार असून, घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीमुळे मोठी झळ बसणार आहे.
‘टाटा पॉवर’ने राज्य वीज नियामक आयोगाकडे महसुली गरज आणि वीज दराच्या मंजुरीसाठीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ऑनलाइन सुनावणीही झाली होती. त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वीज दरानुसार १ एप्रिलपासून नंतर वाढीव बिल येणार आहे.
वीज दरवाढीची कारणे -
१) वायर्स व्यवसायाच्या एकूण महसुली गरजेपोटी ‘टाटा’ने दावा केलेल्या ५० टक्के वसुलीऐवजी वायर्स एआरआरच्या पूर्ण वसुलीस मान्यता देण्यात आली.
२) टाटाने ३४६.७९ कोटींचा महसुली परतावा विचारात घेतला नव्हता. आयोगाने विद्युत अपील न्यायाधिकरणाने वीज दराच्या मध्यावधी आढाव्यास स्थगिती दिल्याने विचारात घेण्यात आला आहे.
३) आयोगाने ग्राहकांना मिळणारी रोख सवलत विचारात घेतली आहे. त्यानुसार, २०२३-२४ आणि २०२४-२५ साठीच्या महसुलात १००.२ कोटींची घट झाली आहे.
४) आयोगाने मंजूर केलेल्या २४ टक्के वाढीत हे तीन घटक १२ टक्के आहेत.
युनिट / वीज दर (युनिटनिहाय दर रुपयांत)
०-१०० ५.३३
१०१-३०० ८.१५
३०१-५०० १४.७७
५०१ वर १५.७१
२४ टक्के वाढ मंजूर - २०२४-२५ साठी ‘टाटा’ने दावा केलेल्या सरासरी वीज दरांतील १२ टक्के वाढीऐवजी सुमारे २४ टक्के वाढ मंजूर झाली आहे.
२०२३-२४ साठी मध्यावधी आढावा आदेशामध्ये निश्चित केलेल्या वीज दरवाढीवर स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कमी वसुली झाली. त्यामुळे सध्याच्या वीज दरातील वाढ आवश्यक झाली.