नवीन वर्षात रुग्णसेवेसाठी टाटा प्रोटाॅन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:05 AM2021-01-01T04:05:12+5:302021-01-01T04:05:12+5:30

शुुभवार्ता : इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर उपचार स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्करोग रुग्णांसाठी ...

Tata Proton ready for patient care in the new year | नवीन वर्षात रुग्णसेवेसाठी टाटा प्रोटाॅन सज्ज

नवीन वर्षात रुग्णसेवेसाठी टाटा प्रोटाॅन सज्ज

Next

शुुभवार्ता : इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर उपचार

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्करोग रुग्णांसाठी वरदान ठरणारे टाटा रुग्णालय प्रशासनाचे प्रोटाॅन थेरपी केंद्र नव्या वर्षांत रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. पूर्वीपासून कर्करोगावर रेडिएशन थेरपीने उपचार केले जातात; पण प्रोटॉन थेरपीने हे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर उपचार केले जातात. त्यामुळे कर्करोग रुग्णांसाठी ही अद्ययावत उपचारपद्धती नवसंजीवनी ठरणार आहे.

खारघर येथील केंद्रामध्ये प्रोटॉन थेरपी सुरू करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून पूर्वतयारी सुरू होती. देशातील केवळ १२० देशांमध्ये ही प्रोटाॅन बीम थेरपी उपलब्ध आहे, आता त्यात टाटा कॅन्सर रुग्णालयाचाही समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये ही थेरपी उपलब्ध करणारे टाटा मेमोरियल हे पहिले केंद्र आहे. यासाठी हैड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र खारघर येथील केंद्रात आणले आहे. ही उपचारपद्धती खर्चिक असली तरी टाटा रुग्णालयात ५० टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

अमेरिकेसारख्या देशामध्ये या उपचाराचे एक चक्र घेण्यासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात येतो. या मशीनची किंमत सुमारे ५५० कोटी रुपये आहे. केंद्रातील उपकरणे बेल्जियममधून आणण्यात आली आहेत. या उपचार पद्धतीचा फायदा कॅन्सरग्रस्त मुलांना सर्वाधिक मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रोटॉन बीम थेरपीच्या मदतीने डोके, यकृत, मेंदू, स्तन, वृषण यासारख्या कॅन्सरवर उपचार करणेही शक्य होईल. ट्युमरच्या उपचारपद्धतीमध्ये ही सर्वाधिक उपयोगी असल्याचे आयबीएचे संचालक डॉ. राकेश पाठक यांनी सांगितले. या केंद्राच्या निर्मितीकरिता एसटीआरईसी संस्थेचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, बेल्जियमचे कॅन्सुलिएट जनरल पिअर इमॅन्युअल यांचे मोलाचे साहाय्य लाभले आहे.

* ऐन कोरोना संक्रमण काळात सहा महिने राबले हात

कोरोना संसर्गाची भीती, हवाई-रस्ते वाहतुकीस निर्बंध, निसर्ग चक्रीवादळ अशा वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देऊन टाटा रुग्णालय आणि आयबीएचे डॉक्टर-अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांच्या सेवेकरिता अहोरात्र झटत राहिले. या केंद्राच्या कामाकरिता राज्य शासन, स्थानिक यंत्रणा, पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन देशातील विविध राज्यांतून तंत्रज्ञांना एकत्र आणण्यात आले. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १ हजार १०० टनांच्या उपकरणांची जोडणी या ठिकाणी करण्यात आली. ३० जानेवारी ते ३० जुलै या ऐन कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात आयबीए आणि टाटा रुग्णालयाच्या चमूने एकत्र येऊन येथील उपकरणांची जोडणी केली. कोरोनामुळे परदेशातील कर्मचाऱ्यांशी सोशल मीडियाद्वारे चर्चा करून येथील उपकरणे जोडण्यात आली. यामुळे बराचसा वेळ वाचून हे केंद्र रुग्णसेवेसाठी वेळेच्या आधी सज्ज होत असल्याचा आनंद आहे.

वर्षाच्या मध्यापर्यंत केंद्राचे कार्य होणार सुरू

देशात दरवर्षी ५० हजार बालकांना कर्करोगाची बाधा होते. यातील जवळपास दोन हजार बालकांसाठी ही थेरपी फायदेशीर ठरू शकते. जगभरात ७७ ठिकाणी ही उपचारपद्धती उपलब्ध असून, यात टाटा मेमोरियल रुग्णालयाचाही समावेश आहे. या संपूर्ण उपचार पद्धतीचा खर्च ३० लाख ते १.५ कोटी इतका आहे. सध्या केवळ चेन्नई, तमिळनाडू येथील रुग्णालयात ही उपचारपद्धती उपलब्ध आहे. या केंद्रांमुळे राज्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना लाभ मिळणार आहे. या केंद्राचे उद्घाटन जून-जुलै २०२१ पर्यंत होईल, अशी अपेक्षा असल्याचे टाटा मेमोरिअलचे डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी सांगितले.

* अन्य पेशींवर दुष्परिणाम नाही

शरीरातील कर्करोगांच्या पेशींना मारण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबविण्यासाठी रेडिएशन थेरपी दिली जाते. यामुळे शरीरातील इतर पेशीही नष्ट होतात. याचे सर्वाधिक दुष्परिणाम बालकांवर होत असून, त्यांच्या शरीरातील स्नायू, हाडे, मेंदू, हृदय यांच्या विकास आणि वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात. रेडिएशनमध्ये कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कर्करोगांच्या पेशी नष्ट करणे यासाठी प्रोटाॅन थेरपी विकसित होत आहे. यात कमीत कमी डोसमध्ये गाठीमधील कर्करोगांच्या पेशी नष्ट केल्या जातात आणि तेथील अन्य पेशींवर याचे दुष्परिणाम होत नाहीत, अशी माहिती टाटा मेमोरिअलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

..........................

Web Title: Tata Proton ready for patient care in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.