२३ जानेवारीपासून एअर इंडियाचे स्टेअरिंग येणार टाटांच्या हाती?; सेवा योजनेची प्रतीक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:20 AM2021-11-11T07:20:49+5:302021-11-11T07:21:07+5:30
एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण झाल्यानंतर तिच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबई : एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण झाल्यानंतर तिच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, २३ जानेवारी २०२२ पासून एअर इंडियाचे स्टेअरिंग टाटांकडे सुपूर्द करण्याचे नियोजन असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या समभाग खरेदी करारानुसार, २३ जानेवारी २०२२ पर्यंत एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस (दोन्ही १०० टक्के) आणि एआय-सॅट्सची (५० टक्के) हिस्सेदारी नियंत्रित करण्यासह विमान प्रचलनाची जबाबदारी टाटा समूहाने हाती घ्यायची आहे. शिवाय स्वामित्व हस्तांतरणासाठी सुरू असलेल्या तयारीबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.
अंतिम ताळेबंद अहवाल तयार करताना आलेल्या अडचणी किंवा त्रुटींमुळे निर्धारित मुदत गाठणे शक्य न झाल्यास परस्पर सहमतीने वाढीव मुदत घेता येईल. परंतु, दोन्ही पक्षकारांनी करारात नमूद केल्यानुसार कार्यवाही सुरू असल्यामुळे तारीख लांबण्याची शक्यता धूसर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
सेवा योजनेची प्रतीक्षा कायम
येत्या काही दिवसात टाटा समूहाकडून एअर इंडियाचे संचलन केले जाणार असले तरी, त्यांनी अद्याप सेवा योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही विमान कंपनी किफायतशीर सेवा देईल की मेगा एअरलाईन म्हणून कार्यरत राहील, याची प्रतीक्षा कायम आहे. शिवाय नव्या व्यवस्थापनाची संरचना, कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण आणि केबिन अपग्रेड योजनेविषयी कुतूहलही कायम आहे.