जोडीदार देतोय लग्नाच्या गाठीला टॅटूची साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:28 AM2018-12-20T03:28:13+5:302018-12-20T03:28:54+5:30
लग्नानंतर ‘तो’, ‘ती’ काढतेय टॅटू : प्रेम व्यक्त करण्याची आगळीवेगळी पद्धत प्रचलित
कुलदीप घायवट
मुंबई : प्रत्येक जण आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी नवनवीन पद्धत वापरतो. जोडीदारासोबत संपूर्ण जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेताना वेगवेगळ्या शक्कला लढवतो. आयुष्यभराची कमिटमेंट दर्शविण्यासाठी आता टॅटूचा ट्रेंड आला आहे. टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. मैत्री, प्रेम, लग्न आणि त्यानंतर पुन्हा मैत्री आणि प्रेम कायम राहील, ही साक्ष टॅटूतून देण्यात येत आहे. लग्नाचे पवित्र बंधन केवळ एक वस्तू नाही, तर ती आमच्या शरीराचा भाग असला पाहिजे, असा विचार तरुणाईकडून केला जात आहे.
‘तो’ आणि ‘ती’ बोटावर रिंग टॅटू काढतात. बोटावर रिंगचा टॅटू गोंदवून प्रेमाची कबुली देण्यात येत आहे. त्यामुळे रिंग टॅटूची क्रेझ खूप वाढत आहे. जोडप्यांमधील प्रेम टॅटूप्रमाणे कधीच मिटणार नाही, या धारणेतून दिवसेंदिवस कपल्स् टॅटू काढण्याकडे कल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिंग फिंगरमध्ये टॅटू गोंदविण्याबरोबरीनेच जोडीदाराचा फोटो, पहिल्या भेटीची तारीख, भावना व्यक्त केलेला दिवस, लग्नाची तारीख, वेगवेगळ्या शैलीत आपल्या जोडीदाराचे नाव लिहिण्याला तितकाच प्रतिसाद आहे. प्रेम व्यक्त करण्याची आगळी वेगळी पद्धत खूप प्रचलित झाली आहे.
गोंदविणे या संकल्पनेतून टॅटू कला आली. गोंदविण्याची संकल्पना टॅटूच्या माध्यमातून टिकून आहे. त्यामुळे टॅटूचा ट्रेंड नवीन नसला, तरी कपल्स्नी टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड अलीकडे खूप मनावर घेतला आहे. जोडप्यांनी एकत्रित एकसारखा टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड लग्नाच्या सीझनमध्ये जास्त पाहायला मिळतो. साखरपुडा ते लग्नादरम्यानच्या काळात जोडीदार टॅटू काढून घेतात. प्री वेडिंग शूटसाठी टॅटू काढून घेण्याला प्राधान्य दिले जाते. टॅटूमध्ये लव्हबर्डस्, हार्ट अशी प्रेमाची प्रतीकात्मक चिन्हे किंवा डिझाइन्स् काढली जात आहेत. कपल्स टॅटूमध्ये सध्या एकमेकांच्या नावाचा टॅटू काढण्याचा ट्रेंड खूप आहे. मराठी, इंग्रजी, चीनी, जपानी, फ्रेंच या भाषेतून नाव लिहून घेतले जात आहेत.
सेलिब्रिटी ही लग्नाची गाठ बांधून टॅटू गोंदवित आहेत. सेलिब्रिटी टॅटू आर्टिस्ट सनी भानुशाली यांनी सांगितले की, लग्नसराई सुरू झाली असून, कपल टॅटू काढण्याचा कल वाढत असून, लग्नाची तारीख, विविध लिपींमधील प्रियकराचे नाव, एकमेकांसाठी प्रेमाचा संदेश अशा विविध तºहांनी प्रेम व्यक्त केले जातेय.
जोडप्यांसाठी टॅटूचे विविध प्रकार -
रिंग टॅटू - अंगठी घातल्या जाणाऱ्या बोटावर रिंग टॅटू गोंदविण्यात येत आहे. प्रेमाचा क्षण आयुष्यभर आठवणींमध्ये कैद करायचा असेल, तर तिला ‘रिंग टॅटू’ने प्रपोज करण्याचा अनोखा पर्याय ठरू शकतो.
डेट टॅटू - धकाधकीच्या जीवनात महत्त्वाचे दिवस विसरता कामा नये, यासाठी जोडप्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस टॅटूच्या माध्यमातून कायमस्वरूपी आठवणीत ठेवता येऊ शकतो.
मिनिमलिस्टिक टॅटू - जोडपी लहानसा टॅटू काढून घ्यायला प्राधान्य देत आहेत. लेस इज मोअर म्हणजे मिनिमलिस्टिक टॅटू.
व्हाइट टॅटू - ठरावीक अंतरावरून दिसणारा टॅटू सध्या खूप लोकप्रिय आहे. मात्र, व्हाइट टॅटू सूर्यप्रकाशापासून वाचविले पाहिजेत. कारण सूर्यप्रकाशात या टॅटूचा नैसर्गिक रंग कमी होतो.