'सावरकर : विस्मृतीचे पडसाद'चे झाले प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - एखादं फुल ताजं असतं ना, तशा तात्यांच्या आठवणी माझ्या मनात मात्र अगदी ताज्या आहेत. आताच्या पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेज...अशा शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या आठवणींनी नुकताच उजाळा दिला. निमित्त होते ते ' सावरकर : विस्मृतीचे पडसाद' या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. हा सोहळा पुरंदरे यांच्या निवासस्थानी झाला. विक्रम संपत लिखित या पुस्तकाचा अनुवाद रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी केला आहे.
१०० व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांची आणि सावरकर यांची भेट १९३८ ते अगदी सावरकर यांच्या निधनापर्यंत होत होती. सावरकरांच्या सांगताना ते म्हणाले की, काजव्याने सूर्याची काय आठवण सांगायची? पुढे पुरंदरे यांनी सावरकर यांचा आवाज हुबेहूब काढला. सावरकरांसमोरच त्यांनी त्यावेळी त्यांच्याच भाषणाची नक्कल सादर केली होती. तेव्हा सावरकरांनी बळवंत मोरेश्वर पुरंदरे या मुलाचे गुण हेरले आणि केवळ नकला करीत राहाणार का, असे विचारीत कलेचा स्वतःसाठी काही उपयोग कर, असे सांगितले, अशी आठवणही पुरंदरे यांनी सांगितली.
.....