मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याला आता चार दिवस होत आले असले तरी भारतीय नौदलाने शोधमोहीम चालूच ठेवली आहे. आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता या युद्धनौकांसह नौदलाची अन्य जहाजे, टेहळणी विमान आणि सी-किंग हेलिकाॅप्टर्स समुद्रात घिरट्या घालत आहेत. पी ३०५ या बार्जवरील १८६ जण आणि वरप्रदा बोटीवरील दोन अशा १८८ जणांना नौदलाने आतापर्यंत सुखरूप किनाऱ्यावर आणले आहे. तर, ४९ जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित २६ जणांचा शोध अद्याप सुरू असल्याचे नौदलाने स्पष्ट केले.
चक्रीवादळाच्या तडाख्याने ४९ जणांचे मृत्यू झाले तर २६ बेपत्ता लोकांच्या सुखरूप सुटकेच्या आशा मावळल्या असून या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. ओएनजीसीसह उत्खनन करणारी अफ्काॅन्स कंपनी तसेच बार्ज चालक डर्मस्ट यांच्याकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे. हवामान खात्यासह तटरक्षक दलाने तौक्ते चक्रीवादळाचा इशारा १४ मे रोजी दिला होता. मात्र, ओएनजीसीने त्याकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. चक्रीवादळाची दिशा बदलल्याचे सांगत ओएनजीसीने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी हवामान खात्याकडून हा दावा फेटाळण्यात आल्याने ओएनजीसीवर राजकीय नेत्यांकडून प्रश्नांचा भडिमार सुरू आहे.
दुर्लक्ष झाल्याचा आरोपअफ्कॉन्सने बार्जला सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी त्याचे संचालन करणाऱ्या कंपनीवर असल्याचा दावा केला आहे. चक्रीवादळाच्या सूचनेनंतर सर्व जहाजांना नियमानुसार सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या, असाही दावा त्यांनी केला. मात्र, सूचना मिळून बार्ज किनाऱ्यावर आणली नाही. दोन दिवसांचे काम बाकी असल्याने असे करण्यात आले. चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकण्यापूर्वीच समुद्रात हालचाल जाणवत होती. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडूनही करण्यात येत आहे.