मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बाॅम्बे हाय परिसरातील तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या विविध नौका आणि व्यापारी तराफांना बसला आहे. अत्यंत खराब हवामानामुळे भरकटलेल्या ५ नौकांमधील ४१० लोकांची सुटका करण्यात मदत आणि बचाव पथकांना यश आले आहे, तर अद्याप ९३ लोकांचा शोध सुरू आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या बार्ज आणि विविध नौकांवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदल, तटरक्षक दल, ओएनजीसीसह विविध यंत्रणांकडून शोध व बचाव मोहीम सुरू आहे. बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी मुंबईपासून ३५ सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी-३०५ या नौकेवर अडकलेल्या २७३ जणांच्या सुटकेची मोहीम हाती घेतली.
दुसऱ्या एका मोहिमेत गॅल कन्स्ट्रक्टर या नौकेवरील १८० जणांची सुटका करण्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांना यश आले आहे. याशिवाय, गुजरातच्या पिपावाव किनाऱ्यापासून आग्नेयेस १५ ते २० सागरी मैलांवर असलेल्या सपोर्ट स्टेशन-3, ग्रेट शिप अदिती आणि ड्रील शिप सागर भूषण या जहाजांसाठीही शोध व बचाव मोहीम सुरू आहे. आयएनएस तलवार या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे.
१६ मृतांच्या वारसांना ४ लाख‘तौक्ते’ चक्रीवादळातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तत्काळ दिली जाईल. घरांचे पत्रे उडालेल्या नागरिकांना पत्र्यांचे वाटप लगेच सुरू करण्यात येणार आहे. धान्य व केरोसिनचाही पुरवठा केला जाईल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्याच्या माहितीनुसार १५ हजार घरांची पडझड झाली आहे. १६ जणांचा मृत्यू झाला आहे. काही बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे. कोकणात, आंबा, काजू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत दिली जाईल. कोकणात वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठीची योजना तयार केली जाईल. - विजय वडेट्टीवार
मालवणात मच्छीमारांचे नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात ५५० मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्या. ३३ लहान व ४ मोठ्या नौकांचेही नुकसान झाले आहे.
आंबा, नारळ, भात पिकाला फटकारायगडमध्ये चक्रीवादळाचा अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विजेच्या खांबांची हानी झाल्याने अद्यापही ६६१ गावे अंधारात आहेत. सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वर्तविला.