Join us  

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईत कोसळली ८१२ झाडं, कोसळलेल्या झाडांपैकी ७० टक्के विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 9:34 PM

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या तडाख्याने दोन दिवस पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे.

मुंबई - तौत्के चक्रीवादळात वेगाने वारे वाहत असल्याने शनिवार ते सोमवार या दोन दिवसांत मुंबईतील तब्बल ८१२ झाडे आणि एक हजार ४५४ फांद्या कोसळल्या आहेत. यापैकी ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रात तर ३०८ झाडे  सार्वजनिक परिसरातील आहेत. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. मात्र, महापालिकेच्या उद्यान विभागाने दिवसरात्र काम करून झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

कोसळलेली ७० टक्के झाडं विदेशी....

चक्रीवादळाच्या तडाख्याने दोन दिवस पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ३२३ झाडे पडली होती. त्यावेळीही विदेशी झाडांचे प्रमाण अधिक होते.

तीन दिवसांत कोसळलेली झाडं...

१६ ते १८ मे या तीन दिवसांमध्ये कोसळलेल्या ८१२ झाडांमध्ये २४९ झाडे ही शहर तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील आहेत. उर्वरित ३०७ झाडे पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे १६ व १७ मे रोजी पडली. तर २६७ झाडे १८ मे रोजी पडली आहेत. वादळाच्या प्रभावामुळे एक हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. यापैकी, ७९८ फांद्या या खासगी परिसरातील तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

ट्री ऑडीट....

नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची कार्यवाही नियमितपणे करण्यात येणार आहे.

येथे पडली सर्वाधिक झाडं

विभाग                               झाडं

एम पश्चिम चेंबूर                     ८४

एच पश्चिम वांद्रे पश्चिम            ६७

एल कुर्ला                                ५७

के पश्चिम अंधेरी पश्चिम           ५३

जी उत्तर धारावी                     ४९

टॅग्स :तौत्के चक्रीवादळमुंबई