Tauktae Cyclone: बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे नुकसान नाही, प्रशासनाच्या पूर्वतयारीला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:50 PM2021-05-17T16:50:11+5:302021-05-17T16:50:36+5:30
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱया वादळी वाऱयांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱया वादळी वाऱयांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. या कोविड केंद्राची मुख्य संरचना स्थिर आहे. प्रतीक्षालयातील छताला वादळामुळे हानी पोहोचू नये म्हणून प्रशासनाने स्वतःच प्रतीक्षालय काढून ठेवले आहे. वादळ व पाऊस ओसरताच बीकेसी कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसह प्रतीक्षालय पूर्ववत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत ताशी सुमारे ८० किलोमीटर या वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील २४३ कोविड बाधित रुग्णांना शनिवारी (दिनांक १५ मे २०२१) रात्रीच इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केले आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री.सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती सर्व कार्यवाही करण्यात आली आहे.