मुंबई : राज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत झालेल्या पाहणीनुसार, मुंबई शहरात ३३७ झाडे पडली, १२ घरे अंशत: पडली व दोघांचा मृत्यू झाला. मुंबई उपनगरात २०,१५८ जणांना फटका बसला. २९६ झाडे पडली, ६८ घरांचे अंशत: नुकसान झाले. ठाणे जिल्ह्यात १३८ गावांना आणि १३०० जणांना फटका बसला. सात शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले. ९४३ झाडे पडली. २५ घरांचे पूर्णत: तर २०९१ घरांचे अंशत: नुकसान झाले. तीन जणांचा मृत्यू झाला. १८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पालघर जिल्ह्यात ९०९ गावांना फटका बसला. १५३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. एक लाख ३० हजार लोकांना फटका बसला. शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या ४८ इमारतींचे नुकसान झाले. विजेचे १ हजार ७५ खांब पडले. ७९० झाडे पडली. ५,२१७ घरांचे अंशत: तर ७५ घरांचे पूर्ण नुकसान झाले. तिघांचा मृत्यू झाला.रत्नागिरी जिल्ह्यात ६९५ गावांना फटका बसला. २,५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६,३५८ नागरिकांना फटका बसला. १२६ शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारतींचे नुकसान झाले. ७९० झाडे पडली. १६२६ वीजखांब पडले. ४,३५९ घरांचे अंशत: तर ११ घरांचेपूर्णत: नुकसान झाले. दोघांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात १८२० गावांमध्ये फटका बसला. १५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २७,७९८ नागरिकांना फटका बसला. ११,३९१ घरांचे नुकसान झाले. शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या १३५३ इमारतींचे अंशत: नुकसान झाले. विजेचे १०३२ खांब पडले. चार जणांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४० गावांना फटका बसला. ६,६५२ घरांचे अंशत: तर २३ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. ३,३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानझाले. १५,६४४ नागरिकांना फटका बसला. २२५ शासकीय इमारती,शाळा, महाविद्यालयांचे नुकसानझाले. २१ हजार ८९० झाडे पडली. १२८१ वीजखांब पडले. तिघांचा मृत्यू झाला.
४,२३० गावांना फटका- एकूण ४,२३० गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. ९,१४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २ लाख २१ हजार २५८ नागरिकांना फटका बसला. - शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांच्या १७५९ इमारतींचे नुकसान झाले. ५,०५१ वीजखांब पडले. २५,५४१ झाडे पडली. एकूण १७ जणांचा मृत्यू झाला.