मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा फटका गेट वे ऑफ इंडिया परिसराला सोमवारी बसला. या पुरातन वास्तूच्या जेट्टी वॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले. तसेच समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहून आला होता. त्यामुळे महापालिकेच्या तब्बल शंभर कामगारांनी सकाळी या परिसराची साफसफाई करीत दहा ट्रक कचरा साफ करण्यात आला.
चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी दिवसभर सोसाट्याचा वारा आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. मे महिन्यातील या विक्रमी पावसाचा तडाखा अनेक भागांना बसला. मात्र मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडिया या पुरातन वास्तूच्या जेट्टी वॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रचंड मोठ्या वजनाचे दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले. त्याचप्रमाणे वादळामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ व रेती वाहून आल्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला होता.
शंभर कामगार, दहा ट्रक कचरा...
गेट वे ऑफ इंडिया हा परिसर मुंबईत महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ व पुरातन वास्तू असल्याने ए विभाग कार्यालयाने मंगळवारी सकाळीच सफाई मोहीम हाती घेतली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आल्यामुळे सफाईसाठी शंभर कामगारांची फौज तैनात करावी लागली. दोन जेसीबीद्वारे दहा लहान व मोठे ट्रक भरून गाळ, कचरा वाहून नेण्यात आला. यावेळी ए विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, पालिका पुरातन वास्तू जतन समितीचे संजय सावंत तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जेट्टीच्या भिंतीची दुरुस्ती....
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी दुपारी गेट वे ऑफ इंडिया या पुरातन वास्तूची संपूर्ण पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. जेट्टीच्या भिंतीचे नुकसान झाले असल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टने ऑडिट करून ही भिंत दुरुस्त करावी, जेणेकरून भविष्यकाळात मोठे संकट उद्भवणार नाही, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.