- मनीषा म्हात्रेमुंबई : ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारे वारे... त्यात आठही नांगर तुटल्याने हेलकावणारी बार्ज ओनएजीसी प्लॅटफाॅर्म एचसीवर धडकली. बार्जमध्ये पाणी शिरू लागताच एकेकाने लाईफजॅकेट घालून पाण्यात उड्या घेतली. १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मदतीला कोणीही पोहोचू शकत नाही. डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकला हाेता. देवाचा धावा करत होताे. सुदैवाने मदत मिळाली आणि आम्ही बचावलो. काळजाचा थरकाप उडविणारा हा अनुभव या दुर्घटनेतून वाचलेले अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी पोलिसांपुढे कथन केला.मालाडमध्ये राहणाऱ्या शेख (४९) यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून ते बार्ज पी - ३०५ वर आहेत. १२- १३ मे दरम्यान तौक्ते चक्रीवादळ येण्याची पूर्वसूचना हवामान विभागाकडून मिळाली. १५ मे रोजी रात्री ११ वाजता जोरादार वारे वाहू लागले. वाऱ्यांचा ताशी वेग ४०-५० नाॅट्स होता. त्या रात्री आम्ही २६१ लोक बार्जवर होतो. त्यामध्ये २४ क्रू, जेवण बनविणारे २५ लोक व इतर कंपनींचे लोक होते. रात्री १२ नंतर वाऱ्याचा वेग दुप्पट झाला. वादळाचा आवाज धडकी भरविणारा होता. अँकर तुटले.त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास एस १, एस २, पी १ असे तीन अँकर तुटले व बार्ज जोराने हेलकावे खाऊ लागले. आम्ही २६१ लोक रात्रभर जागे होतो. सकाळी ८ वाजता सर्व अँकर तुटलेले होते. बार्जला आधार नव्हता. वाऱ्याचा वेग (६० ते ७० नाॅट) असल्याने जहाजावरील १७ टनांचा कंटेनर समुद्रात पडला. पावणे दहाच्या सुमारास बार्ज ओनएजीसी प्लटफाॅर्म एचसी धडकले. आत समुद्राचे पाणी शिरू लागले. बार्ज बुडण्यास सुरुवात झाली हाेती. सकाळी साडेदहाच्या सुमारास २० ते २५ जणांनी पाण्यात लाईफ राफ्ट टाकून बार्ज सोडला. त्यावेळी जवळील नीलम फिल्डवरील तराफ्याला मदतीस येण्याची विनंती केली. दरम्यान, इंडियन नेव्ही व इतर बोटी बचावासाठी आल्या, वाऱ्याचा वेग ७० ते ८० नाॅट असल्याने इतर बोटी बचावासाठी पुढे येऊ शकत नव्हत्या.
...अन् जीव वाचलासायंकाळी ५ वाजता सर्वांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. त्यापूर्वी मीही समुद्रात उडी मारली होती. त्यानंतर माझ्या आजूबाजूला बोटीवरील अनेक लोक समुद्रात पोहत होते. मदतीला आलेल्या बोटी समुद्रात समोर दिसत होत्या. आम्ही १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून समुद्रात होताे. सकाळ पाहू की नाही ही भीती होती, अखेर १७ मे रोजी सकाळी १० वाजता वेग कमी होताच, ऑफशेअर एनर्जीच्या जहाजातील लोकांनी आम्हाला वाचविले. त्यानंतर थेट हॉस्पिटलमध्ये जाग आल्याचे शेख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद आहे.