मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा जबरी तडाखा सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरला बसला. ताशी ८० ते १२० किमी वेगाने वाहणारा धडकी भरवणारा सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे हजारांवर झाडे भुईसपाट झाली, तर चार हजारांवर घरांचे नुकसान झाले.
रायगड जिल्ह्यात चार, रत्नागिरी, ठाणे प्रत्येकी दोन, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक मीरा राेड येथे १ अशा एकूण ११ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबईत पहाटे चारपासून वादळी वारे वाहू लागले. सोबतच जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरली. सकाळी १० वाजल्यानंतरही पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा वेग कायम होता. दुपारी तीनपर्यंत निसर्गाचा हा रौद्रावतार कायम होता. सखल भागात पाणी साचल्याने आणि मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रॅकवरदेखील झाडे पडल्याच्या घटना घडल्याने लोकल वाहतुकही काही काळ खंडित झाली आणि धावत्या मुंबईला ब्रेक लागला.
केंद्रीय पथक येणारवादळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच अडचणीची आहे. कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची भूमिका राज्य शासनाला घ्यावी लागणार आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडून केंद्राकडे केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई विमानतळ ११ ते रात्री १० वाजेपर्यंत तब्बल ११ तास बंदवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरील विमानसेवा सोमवारी बंद ठेवण्यात आली. चेन्नईहून निघालेले विमान सकाळी ८.१५ वाजता सुरतच्या दिशेने तर लखनौवरून मुंबईला येणारे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले. जवळपास २०० विमान फेऱ्यांना वादळाचा फटका बसला.
कोकणात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा येथे सहा घरांची पडझड झाली.
पालघरमध्ये प्रतितास १२५ कि.मी. वारेपालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात १२५ प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बोईसर मंडल क्षेत्रात नऊ तासांत ११४, तर तारापूरला १२० मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळीही पाऊस सुरूच होता. वादळी वारा व पावसामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. सकाळपासून वीज नसल्याने इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे पाण्याविना हाल सुरू होते. शेकडो घरांचे पत्रे उडून गेले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देशतौक्ते चक्रीवादळाचा मुंबई तसेच सागरीकिनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील प्रभाव ओसरला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ दिला नाही. पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात १० वर्षांतील थरारगोव्यात तौक्ते चक्रीवादळ हे गेल्या दहा वर्षांतील अत्यंत भीषण वादळ ठरले आहे. हे चक्रीवादळ गोवा किनारपट्टीच्या सर्वांत जवळच्या अंतरावरून गेले आहे. त्यामुळे गोव्याच्या किनारपट्टीला याचा जबर फटका बसला. सकाळी ९ ते ११ या वेळेत ते गोव्याच्या सर्वाधिक जवळ होते. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूपासून गोवा किनाऱ्यामधील अंतर हे अवघे १०६ किमी इतके होते. चक्रीवादळे नेहमी झिकजॅग अशा मार्गाने सरकत असतात. त्यामुळे कधी १०६ तर कधी १४० किमी अंतरावरून हे चक्रीवादळ सरकताना दिसत होते.
सी लिंक बंदखबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण मुंबईला जोडणारा सी लिंक बंद करण्यात आला होता.
रात्री उशिरा हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले, दिवच्या पूर्वेला हे वादळ धडकल्यानंतर परिसरात मोठे नुकसान झाले आहे.अहमदाबाद येथे जोरदार पाऊस झाला