मुंबई : ताैक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
ताैक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन चक्रीवादळाची सद्य:स्थिती व महापालिकेने केलेल्या पूर्वतयारी कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे उपस्थित होत्या. मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.
ताैक्ते चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; काही ठिकाणी जोराचा पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता पुढील दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- नागरिकांना हलविणार समुद्रकिनाऱ्यालगत, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र हलविणे गरजेचे झाल्यास, त्या दृष्टीने तात्पुरते निवारे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत.
- प्रतिसाद पथक नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाहीदेखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.
- पूर बचाव पथके वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सहा चौपाट्यांवर पूर बचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी पोलिसांच्या मोबाइल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- ५१२ नौका सुखरूप पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने अलर्ट जारी केला होता. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- २५ बोटी आश्रयासाठी रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ९६ नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी आल्या आहेत, तर परप्रांतीय कोणतीही नौका रायगड जिल्ह्यात आश्रयाला आलेली नाही
नागरिकांना इशारा मुंबईतील चौपाट्या, तसेच समुद्रकिनाऱ्यानजीकचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच या अनुषंगाने मुंबई पोलीस व अग्निशमन दल यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
रेल्वे सेवा सुरू राहणार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधनसामग्रीसह सुसज्ज आहेत. रेल्वेच्या स्तरावर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून, उपनगरीय रेल्वे सेवा ही पुढील दोन दिवस सुरू राहील, अशी माहिती रेल्वेद्वारे देण्यात आली.
तातडीने बॅरिकेड्स लावा मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) एमएमआरडीए आदींद्वारे ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांविषयी कामे सुरू आहेत, अशा सर्व ठिकाणी सुयोग्य प्रकारे व तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणी साचू नये सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून, ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खात्री करण्यात आली आहे.
रिफ्लेक्टिव्ह जॅकेट महापालिकेचे कर्तव्यावर उपस्थित असणारे कामगार कर्मचारी व अधिकारी यांनी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवसाच झाली रात्रतौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत रविवारी पूर्णत: ढगाळ वातावरण होते. रविवारी मुंबईवर पावसाचे ढग जमा झाले. मात्र, पावसाचा काही पत्ता नव्हता. सकाळी किंचित, संध्याकाळी किंचित रात्री काहीशा वाऱ्याच्या वेगाने पावसाने मुंबईत हजेरी लावली होती. दिवसभर मुंबईत चक्रीवादळाचा प्रभाव ढगाळ हवामानामुळे दिवसाची रात्र झाल्याचे निदर्शनास येत होते.
बेस्टही झाली सज्जबेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातर्फे विविध ठिकाणी वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातर्फे नियंत्रण कक्षांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वाहतूक व विद्युत पुरवठा विभागातर्फे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षांही उपक्रमाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी १७ मे रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. १७ मेपासून १८ मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी ६५ ते ७५ किमी असू शकतो. तो वाढत ताशी ८५ किलोमीटर इतका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरून किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासांत खवळलेला असेल. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद येथे हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.