मुंबई : सोमवारी सकाळपासूनच मुंबईच्या समुद्रात चक्रीवादळाचे तांडव सुरू झाले. सकाळी मुंबईसह उपनगरात साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी १२च्या सुमारास चक्रीवादळ मुंबईच्या १४५ किमी अंतरावर दाखल झाले आणि मुंबईत वाऱ्यांसह पावसाचा वेग वाढला. समुद्राला भरती आली. दादर येथील हिंदमातासह सखल भागात पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रयत्नशील हाेते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुंबईत पावसाने तुफान फटकेबाजी केली. याचवेळी वारेही वाहत असल्याने आधीच काेराेनाचा ताप असलेल्या मुंबईकरांवर जणू नवे संकट घाेंघावू लागले.
महापौर किशोरी पेडणेकर याच काळात रस्त्यावर उतरल्या. त्यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी-फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले. पेडणेकर म्हणाल्या की, जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली असून, मनुष्यहानी मात्र कुठेही झाली नाही. अग्निशमन दलातर्फे तातडीने वृक्ष हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. काही किरकोळ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. एनडीआरएफच्या टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या. पोलीस गस्त घालून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील हाेते. पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते. त्यांनी पाण्याचा जलद गतीने निचरा केला, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळाच्या पावसाने वादळी वाऱ्यांसह मुंबई शहर आणि उपनगराला सोमवारी अक्षरश: झोडपून काढले. सकाळच्या तुलनेत दुपारी वारा आणि मुसळधार पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना धडकीच भरली. त्यात दुपारी आलेल्या भरतीने मुंबई तुंबली. यात नेहमीप्रमाणे दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. मान्सून दाखल होण्यापूर्वीच चक्रीवादळाच्या पावसाने मुंबई पाण्यात गेली आणि पुन्हा एकदा यावर्षीच्या मुंबई महापालिकेच्या पावसाळी कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
येथे साचले पाणीमहालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, वडाळा, दादर टीटी, सायन, वरळी, ग्रँट रोड, मस्जिद बंदर आणि कुलाबा येथील सखल भागात पाणी साचले. याव्यतिरिक्त अंधेरी सब वे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सब वे, मालवणी, बोरीवली आणि वाकोला येथील सखल भागात पाणी साचले होते.