रत्नागिरी/ मुंबई: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याचपार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यानंतर आता मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत, असं म्हणत केंद्र सरकारने अधिकाअधिक मदत करावी, अशी साद देखील उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. ( PM Narendra Modi sensitive, Central Goverment should help more; Said CM Uddhav Thackeray)
तौक्ते चक्रीवादळ भीषण होते. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. जे काही नुकसान झाले आहे, केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केलं जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच आम्ही केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत करावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही, असा टोला लगावला.