Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत, मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:29 AM2021-05-28T08:29:39+5:302021-05-28T08:29:57+5:30

Tauktae Cyclone News: राहत्या घरांची पडझड, कपडेलत्ते, भांडीकुंडी यांच्यासह स्थानिक दुकानदार, टपरीधारकांनाही अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या बोटी, जाळ्यांसोबतच पीक नुकसानीसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Tauktae Cyclone: Tauktae cyclone victims to get help at increased rates, Cabinet decision; Rates higher than central government rates | Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत, मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दर

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत, मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दर

Next

 मुंबई : राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राहत्या घरांची पडझड, कपडेलत्ते, भांडीकुंडी यांच्यासह स्थानिक दुकानदार, टपरीधारकांनाही अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या बोटी, जाळ्यांसोबतच पीक नुकसानीसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारच्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार आहे. या वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य निधीमधून करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य व केरोसीन वाटपाचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. तसेच ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून चार लाख रुपयांसोबतच मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून अतिरिक्त एक लाखाची मदत केली जाणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. तसेच, दोन हेक्टरच्या मर्यादेत नारळाच्या झाडांसाठी प्रति झाड २५० रुपये तर सुपारीला प्रति झाडासाठी ५० रुपयांची मदत केली जाणार आहे.

जाहीर झालेली मदत पुढीलप्रमाणे
पूर्णत: क्षतिग्रस्त झालेल्या किंवा अंशत: पडझड झालेल्या (किमान १५ टक्के नुकसान) कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत पडले किंवा पत्रे/कौले/छत उडून गेल्याने घरातील कपडे व घरगुती भांड्यांचे/वस्तूंचे नुकसान झाले आहे अशा प्रकरणी पुढील मदत दिली जाईल.
nघरगुती भांडी / वस्तूंकरिता प्रति कुटुंब पाच हजार रुपये
nकपड्यांसाठी प्रति कुटुंब पाच हजार रुपये
nपूर्णत: नष्ट झालेल्या झालेल्या घरासाठी १ लाख ५० हजार
n१५ टक्के पडझड झालेल्या घरासाठी १५ हजार
n२५ टक्के पडझड झालेल्या घरासाठी २५ हजार
n५० टक्के पडझड झालेल्या घरासाठी ५० हजार
 नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांना १५ हजार प्रति झोपडी अशी मदत देण्यात येईल.

दुकान आणि टपरीसाठी
ज्यांचे नाव स्थानिक मतदारयादीत आहे, जे रेशन कार्डधारक आहेत अशा दुकानदार व टपरीधारकांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

मत्स्य व्यावसायिकांसाठी
बोटींच्या अंशत: दुरुस्तीसाठी १० हजार रुपये, बोट पूर्णतः नष्ट झाली असेल तर २५ हजार रुपये दिले जातील. अंशत: बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीतजास्त पाच हजारांची मदत केली जाणार आहे.

Web Title: Tauktae Cyclone: Tauktae cyclone victims to get help at increased rates, Cabinet decision; Rates higher than central government rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.