‘तौक्ते’ने मुंबईकरांना फुटला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:18+5:302021-05-17T04:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानात उल्लेखनीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, सलग ३ दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना घाम फुटला आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश एवढे नोंदविण्यात आले असून, शनिवारी हेच कमाल तापमान ३७ एवढे होते. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाल तापमानात एका अंशाची घसरण झाली असली तरी उकाडा कायम असून, त्यानेच मुंबईकरांना घाम फोडला आहे.
शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.४ अंश नोंद झाले. सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत शनिवारीचे कमाल तापमान ३ अंशांनी अधिक नोंदविण्यात आले. वाढते कमाल तापमान, चक्रीवादळाने हवामानात झालेला बदल, ढगाळलेली मुंबई आणि उकाड्यात झालेल्या वाढीने मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. ३१ मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला असतानाच दुसरीकडे वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना घाम फुटला आहे.
काही दिवस अशीच परिस्थिती
चक्रीवादळामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईत कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यात आता ढगाळ हवामानामुळे उकाड्यातदेखील मोठी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस मुंबईत अशीच परिस्थिती राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मान्सून दाखल होईपर्यंत वाढणारा उकाडा मुंबईकरांचा असाच घाम काढणार आहे.